पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांना बस चालक म्हणून प्रशिक्षण देऊन, सामाजिक व राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे पाऊल टाकले आहे़. या महिला एसटी बस चालवू लागतील तेव्हा त्यांचा आत्मविश्वास व धाडस सर्वांना प्रेरक ठरेल, असा विश्वास माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी व्यक्त केला़. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटी बसचालकपदी १६३ महिलांची निवड केली आहे़. त्यांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी संपन्न झाला़. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ़.नीलम गोऱ्हे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, आमदार माधुरी मिसाळ, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, माधव काळे उपस्थित होते़ पाटील म्हणाल्या, महिला विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिध्द केले आहे़. आज महिला विमाने चालवित असून, लष्करातही आहेत़. पण महिलांकडून मोठी बस चालविणे तसे आजपर्यंत पाहिले नाही़. अशावेळी एसटीच्या चालक ताफ्यात दाखल झालेल्या महिलांचे धाडस कौतुकास्पद आहे़. महिलांना संधी मिळाली तर त्या संधीचे त्या सोने करतात. हे त्यांनी यातून पुन्हा एकदा दाखवून दिले आहे़. मी १९६२ मध्ये आमदार असताना एसटी जवळून पाहिली असून, एसटीविषयी माज्या मनात आपुलकी आहे़. महिलांमध्ये जन्मत:च मातृत्व असते, त्यामुळे सर्व महिला चालक मातृत्वाच्या भावनेनेच बस चालवतील व त्यातून एक आदर्श निर्माण करतील़. मातृत्व, ममत्व व कर्तृत्व यातून या महिला बसचालक उद्याचा आदर्श ठरतील, असे दिवाकर रावते यांनी सांगितले़. दरम्यान एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मोत पास देण्याची योजना सुरू असून, याद्वारे निवृत्तीनंतर कर्मचारी व त्यांची पत्नी किंवा पती यांना ६५ वर्षांपर्यंत एसटीचा मोफत पास दिला जाणार आहे. महिला सश्क्तीकरणाच्या धोरणाचे कृतीशील पाऊल एसटी महामंडळाने महिला बसचालक नियुक्तीच्या माध्यमातून टाकल्याचे डॉ़ .नीलम गोऱ्हे यांनी सांगितले़. यावेळी सन २०१७ व २०१८ साली विशेष कामगिरी करणाऱ्या तसेच पुरपरिस्थतीत आदर्शवत काम करणाऱ्या महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा सत्कार केला़.
एसटी चालक महिलांचा आत्मविश्वास व धाडस सर्वांना प्रेरक ठरेल : प्रतिभा पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 9:01 PM