लोकमत न्यूज नेटवर्कबारामती : कमी कर्मचारी असतानादेखील बसफेऱ्या वाढवल्याने बारामती एसटी आगाराला यंदा गतवर्षीच्या तुलनेत ४० लाख जादा उत्पन्न मिळाले आहे. प्रवासी वाहतुकीचे योग्य नियोजन आणि कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत त्यामुळे हे शक्य झाले, असे माहिती बारामती एसटी आगाराचे प्रमुख सुभाष धुमाळ यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे एसटी आगार म्हणून बारामतीची ओळख आहे. या आगाराच्या सेवेत ११० बसगाड्या आहेत. सध्या २४० चालक, १८७ वाहक आणि वर्कशॉप कर्मचारी ५३ आहेत. बारामती आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्यादेखील सोडल्या जातात. दररोज ९९८ फेऱ्या गाड्यांच्या होतात. सुटीच्या काळात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा वापर लांब पल्ल्याच्या मार्गावर केल्या. बारामती - दादर, बारामती- मुंबई, बारामती - औरंगाबाद, बारामती - शिर्डी या नवीन गाड्या सुरू केल्या. त्याला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला आहे. याशिवाय बारामती पुणे विनाथांबा गाड्या मोरगावमार्गेधावतात. त्यामुळे नीरामार्गे जाणाऱ्या गाड्यांची संख्या कमी होती. आता नीरामार्गे पुण्याला जाणाऱ्या गाड्यांच्या सहा फेऱ्या नव्याने सुरू केल्या आहेत. त्यामुळेदेखील उत्पन्नवाढीला चालना मिळाली. बारामती आगाराला स्टील बॉडी गाड्यादेखील मिळण्यासाठी मागणी केली असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानादेखीलगाड्यांच्या फेऱ्या १ लाख १० हजार किलोमीटरपर्यंत वाढवल्या. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत ४० लाख रुपये उत्पन्नात वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांचे होणार गुलाबपुष्पाने स्वागतराज्य परिवहन महामंडळाचा म्हणजेच एसटी बससेवेचा उद्या (दि. १ जून) वर्धापन दिन आहे. त्यामुळे प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जाणार आहे. बसस्थानक धुऊन चकाचक केले आहे. या बसस्थानकाच्या अंतर्गत येणाऱ्या नीरा, मोरगाव बसस्थानकावरदेखील हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसटीच्या सेवेतून ३१ मे रोजी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तथा कामगारनेते अरविंदतात्या जगताप वर्धापन दिनानिमित्त प्रवाशांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एसटी आगाराचे उत्पन्न वाढले
By admin | Published: June 01, 2017 1:40 AM