पुणे : राज्यभरात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला कोट्यावधींचा फटका बसला असून प्रवाशांचेही हाल होऊ लागले आहेत. त्या सर्व गोष्टींचा विचार करता एसटी प्रशासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीला मान्यता दिली आहे. पण एसटी कर्मचारी यांच्या मागण्यांचा विचारही केला जात नाहीये. यातच विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडीसरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पाटील म्हणाले, ''कोरोनाच्या संकटकाळात प्रसंगी आपल्या घरापासून दूरवरच्या शहरांमध्ये राहून ज्यांनी कोरोनाशी चाललेल्या युद्धात सहभाग घेतला. अशा एसटी कर्मचाऱ्यांवर एल्गार (ST Strike) करण्याची वेळ यावी. हे महाविकास आघाडी सरकारच्या महाभकास धोरणांचेच अपयश आहे. हा जुलूम मविआ सरकारने त्वरित थांबवावा.''
''मविआ सरकारच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेल्या संवेदना पूर्णपणे मेल्या आहेत. त्यांच्या या गलिच्छ कारभारामुळे कर्मचाऱ्यांना न केवळ संप करावा लागत आहे. तर थेट आत्महत्येचा पर्याय निवडावा लागत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.''
मविआ सरकारच्या मंत्र्यांनी माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत
''एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकार का पूर्ण करत नाही?, एसटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरून आणखी किती दिवस संप करतच काढावे लागणार?, गेले१७ महिने एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही, त्यात तुटपुंजा दिवाळी बोनस, आपलं कुटुंब ते कसे सांभाळणार?, आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा मविआच्या मंत्र्यांसाठी अभिनेत्याचा मुलगा महत्त्वाचा आहे का? निर्दयी मविआ सरकारच्या मंत्र्यांनी माझ्या या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असेही ते म्हणाले आहेत.''
एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका
एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरणाची मागणी पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास १२० पेक्षा जास्त डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका बसत आहे.