मुक्कामी गेलेल्या चालकांना उपाशी रहावे लागते, परतीची वाहतूक नाही मिळाली तर खासगी वाहनाने अथवा रेल्वेने गाठावे लागते घर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने आर्थिक उत्पन्न मिळविण्यासाठी मालवाहतूक सुरु केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र त्या सोबत असलेल्या चालकांचे मात्र हाल होत आहे. दोन दिवसांत आपल्या कामाचाच्या मुळ ठिकाणी परत यावे असा नियम आहे. मात्र चालकांना परतीची वाहतूक मिळत नाही तोपर्यंत त्याला तिथेच रहावे लागते. कधी जेवायला मिळतं तर कधी नाही. प्रशासनाकडून कोणताच आर्थिकभत्ता दिला जात नाही. त्यामुळे एसटी मालामाल अन चालक कंगाल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाने 21 मे 2020 पासून राज्यात मालवाहतूक सुरु केली. आता पर्यंत जवळपास 58 कोटी रुपये माल वाहतुकीतून मिळाले आहे. मात्र एसटी प्रशासनाचे आपल्या चालकांकडे दुर्लक्ष होत आहे. चालकांना कोणत्याच प्रकारचा आर्थिक भत्ता दिला जात नसल्याने चालक स्वत: च्या जवळचे पैसे वापरून आपला खर्च भागवत आहे. त्याबदल्यात चालकांना कोणताच आर्थिक मोबदला दिला जात नाही. शिवाय त्यांची ड्यूटीदेखील नियमानुसार लावली जात नाही.
बॉक्स : उपाशी काढावी लागते रात्र
सध्या लॉकडाऊन असल्याने छोटे हॉटेल बंद आहेत. मालवाहतुकी चे चालक दिवस कसं तरी काढतात, रात्री मात्र जेवणाचे हाल होतात. हॉटेल बंद असल्याने अनेकदा उपाशी रात्र बस स्थानकावरच काढावी लागते.
मालवाहतूक करणाऱ्या गाड्या
राज्यात : 1200
पुणे विभागात : 73
माल वाहतुकीतून मिळालेले उत्पन्न :
राज्यात : 58 कोटी
पुणे विभाग : 4 कोटी
कोट 1
मालवाहतुकीवर जाताना चालकांना सहकर्मचारी आवश्यकच आहे.
चालकांना भत्ता दिला जात नाही. दोन वेळेचे जेवण व नाष्ट्यासाठी तीनशे रुपये प्रतिदिन भोजन भत्ता मिळाला पाहिजे व नाईट अलाउन्स रात्रवस्ती भत्ता मिळावा.
चालकांचे लॅाकडाऊनमुळे प्रचंड हाल होत आहेत. जेवण मिळत नाही व आठवडा सुट्टीला देखील जाता येत नाही. परिपत्रकीय सुचनेनुसार दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस रखडपट्टी नाही झाली पाहीजे. किंवा पुढील विभागाने ती मालवाहतुक करावी मात्र मुळ विभागातूनच कर्मचारी पाठविले जातात. सद्या एस टी वाहतूक बंद असल्याने खाजगी गाड्यांनी स्वखर्चाने जावे लागते. यावर त्वरित उपाययोजना व्हावी.
संदीप शिंदे ,अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना, पुणे.