पुणे : उन्हाळ्याच्या सुट्या लागल्याने अनेक चाकारमानी आपापल्या गावी अथवा फिरायला जाण्यासाठी निघाले आहेत. रेल्वेसह एसटीला देखील प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. एसटी महामंडळाकडून जरी जादा एसटीचे नियोजन केल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मात्र बस स्थानकावर प्रवाशांना तासंतास एसटीची वाट बघावी लागत असल्याचे चित्र आहे.
‘लोकमत’ने वाकडेवाडी (शिवाजीनगर) बस स्थानकावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला यासह मराठवाड्यात जाणाऱ्या एसटीच दीड ते दोन तास फलटावर लागत नाहीत. छत्रपती संभाजीनगर साठी पुण्याहून जाणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. तसेच या मार्गावर विनावाहक शिवनेरी, शिवशाही देखील आहेत. असे असताना देखील प्रवाशांना ३ ते ४ तास वाट बघावी लागत आहे. दर तासाला संभाजीनगरसाठी शिवनेरी असल्याचे एसटीचे अधिकारी सांगतात, प्रत्यक्षात मात्र दिवसभरातून एखाद दुसरीच शिवनेरी पुण्याहून सुटते. संध्याकाळी ६ नंतर तर एकही शिवनेरी नसल्याचे बस स्थानकात प्रवासी गेल्यावर त्यांना सांगितले जाते. हीच परिस्थिती शिवशाहीच्या बाबतीत देखील दिसून आली. याचा फायदा बस स्थानकाच्या बाहेर उभ्या असलेल्या खासगी चारचाकी धारकांना होत आहे.
दुसरीकडे स्वारगेटहून कोकणात, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मार्गांवर जाणाऱ्या एसटींची संख्या देखील वाढवणे गरजेचे आहे. प्रत्येक एसटी फुल्ल भरूनच बस स्थानकाच्या बाहेर पडत असल्याचे चित्र दिसून आले.
खासगी वाहनधारकांचे आणि एसटीच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे ?
एसटी प्रवासी वाहतूक तज्ज्ञांच्या मते ज्या मार्गांवर एसटीला जास्त गर्दी आहे, मुद्दाम त्या मार्गावरील एसटी लवकर फलाटावर उभी केली जात नाही. खासगी वाहनधारकांना प्रवासी मिळावे यासाठी एसटीचे अधिकारी आणि खासगी वाहनधारकांचे साटेलोटे असल्याचे त्यांनी सांगतिले. एसटी स्थानकावर खुलेआम खासगी वाहनाचे एजंट ‘साहब बोलो किधर जाना है, औरंगाबाद को जानेवाली बस और एक घंटा नही आनेवाली’ असे सांगत एसटीने जाण्यासाठी इच्छुक असलेले प्रवासी त्यांच्या कार, बसद्वारे घेऊन जातात. हा प्रकार दररोज होत असताना, एसटी स्थानकावरील सुरक्षा रक्षक, एसटीचे अधिकारी नेमके काय करतात हा खरा प्रश्न आहे.