शिक्रापूर : येथील पुणे-नगर रस्त्यावरील एस टी स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. येथे दिवसेंदिवस तळीराम व कुत्र्यांचा उपद्रव वाढत चाललेला आहे, अनेक नागरिकांनी या स्थानकाला वाहनतळ बनविले असून काही वाहन चालक हे स्थानकाच्या आतमध्ये त्यांची वाहने लॉक करून ठेवत आहेत.
दररोज येथे तळीरामांच्या पार्ट्या होत असल्यामुळे संपूर्ण स्थानकाच्या परिसरात दारूच्या मोकळ्या बाटल्या, सिगारेट व गुटख्याच्या मोकळ्या पुड्या पडलेल्या आहेत. या एस टी स्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या आसन व्यवस्थेवर देखील गुटखा, तंबाखू खाऊन थुकलेले असल्यामुळे प्रवाशांना त्यावर बसने देखील कठीण झालेले असून प्रवाशांना ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे, येथे प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे प्रवाशांना विकत पाणी प्यावे लागत आहे, अनेकदा शालेय विद्यार्थ्यांना एस टी चा पास काढण्यासाठी हेलपाटे मारण्याची वेळ येत आहे, तसेच येथे असलेल्या स्वच्छतागृहाची मोठ्या प्रमाणात दयनीय अवस्था झालेली असून त्यामध्ये मोठमोठे झाडे व गवत वाढलेले आहेत, त्यामुळे येथील प्रवाशी महिला व मुलींची कुचंबना होत आहे.
शिक्रापूर बस स्थानकामध्ये अनेक दिवसांपासून एक बेवारस ट्रक लावण्यात आलेला असताना अनेक वेळा आगार व्यवस्थापकाकडे तक्रार करून सुद्धा अद्याप पर्यंत तो ट्रक तेथून हलविण्यात आलेला नाही. येथे भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्यामुळे अनेकांना कुत्र्यांनी चावा सुद्धा घेतलेला आहे.