प्रसाद कानडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाने मागील चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एलआयसीचा हप्ता कापला खरा पण तो एलआयसीकडे भरलाच नाही. त्यामुळे या चार महिन्यांत कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबास आर्थिक मदतीपासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे.
एसटीच्या या कारभारमुळे अनेक कुटुंबाना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका एसटी प्रशासनाला बसला आहे. अद्याप कर्मचाऱ्यांचे वेतन थकले नसले तरीही एलआयसीचा हप्ता न भरणे ही कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी चाललेला जीवघेणा खेळ आहे. एसटीने जवळपास २० कोटी रुपये एलआयसीकडे भरलेच नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह त्यांचे कुटुंबीय हवालदिल झाले आहेत. एसटी प्रशासनाने ९ कुटुंब सोडता अन्य कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना मदत केलेली नाही आणि दुसरीकडे एलआयसी हप्ते देखील थकविल्याने त्याही मदतीची आशा मालवली आहे.
बॉक्स १
२३९ कर्मचारी मृत मदत केवळ ९ जणांना
आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे एसटीचे २३९ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. पैकी ९ जणांना एसटीने ५० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य केले. ज्या काळात एसटीने एलआयसीचा हप्ता थकविला त्या काळात १०० ते १५० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांना अद्याप एसटीने कोणतीच आर्थिक मदत केलेली नाही.
बॉक्स २
आता केवळ ३५ कोटी शिल्लक
तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटीचा अपघात झाल्यावर प्रवासी व कर्मचारी यांना मदत करता यावी याकरीता अपघात विमा योजना सुरू केली होती. यात प्रत्येक तिकिटातून एक रुपया या योजनेसाठी घेण्यात आला होता. यात जमा झालेला निधी हा ९ मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत म्हणून देण्यात आले. आता यात केवळ ३५ कोटी रुपये शिल्लक आहेत. तर मृतांचा आकडा १५०च्या घरात आहे. त्यामुळे या १५० कुटुंबाना मदत कशी मिळणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बॉक्स ३
सुमारे २४०० कोटी थकविले
एसटीचा आतापर्यंत संचित तोटा हा ९ हजार कोटी रुपयांचा झाला आहे. तर जवळपास २४०० कोटी रुपये थकविले आहे. यात एसटी बँक, एलआयसी, डिझेल, सुरक्षा, ब्रिक्स कंपनी, सेवा निवृत्त कर्मचारी आदींचा समावेश आहे.
कोट १
आमच्या वेतनातून कपात केलेली रक्कम एसटी महामंडळाने त्या-त्या संस्थेकडे वेळेत भरणे आवश्यकच आहे. परंतु गेले काही महीने एलआयसीचे कापून घेतलेले हप्तेही तिथे भरले गेले नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. पॅालीसी लॅप्स होत असलेले मेसेजेस कर्मचा-यांना येत आहेत. बँक सोसायटीचीही तीच त-हा आहे. आमचे हक्काचे पैसे व त्याचा डिव्हिडंड आम्हाला मिळू शकत नाही. दुर्दैवाने जर मृत्यू आला तर त्याची भरपाई कोण देणार? असा प्रश्न आहे.
- संदीप शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना.
कोट २
एलआयसीसाठी कर्मचाऱ्यांची वेतनातून कपात केलेली रक्कम ही प्राधान्याने एलआयसीकडे वर्ग करायला हवी होती. पण ती न भरता काही विभागीय लेखा अधिकाऱ्यांनी ती दुसऱ्या लाभ मिळतील अशा पुरवठादाराकडे वळवली असून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबनाची कारवाई करावी.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस