भोर : भोर-मळे रस्त्यावरील वाढाणे गावाजवळ एसटी बस पलटी होऊन झालेल्या अपघातात एसटी मधील ३ शालेय मुली व दोन महिला जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजता घडली.
भोर आगाराची (एमएच ०६ एस ८९७४) ही भोर-मळे एसटी बस दुपारी २ वाजता भोरहून निघाली. एसटीमध्ये शाळा कॉलेजला जाणारी मुले, मुली व महिला असे ५० प्रवासी होते. एसटी बस दुपारी ३ वाजता वाढाणे गावाजवळ आल्यावर चालकाचा स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यामुळे एसटीतील तीन शालेय, विद्यार्थिनी आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने भोरला आणले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची मोठी दुर्घटना झालेली नाही.
भोर-मळे रस्त्यावर माळवाडी, नऱ्हे, संगमनेर, ब्राम्हणघर, हर्णास, जोगवडी, गीरड, म्हसीवली, वाकांबे, वाढाणे करंदीबु, करदीखुर्द, कांबरे बु, कांबरे, कुरुंजी, मळे या गावातील मुले शिक्षण घेण्यासाठी भोरला दररोज एसटीने येतात. तर अनेक प्रवासी असतात मात्र आज झालेल्या अपघातामुळे विद्यार्थी घाबरले होते. मोकळ्या जागेवर अपघात झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.