देऊळगावराजे : दौंड-सिद्धटेक रोड मार्गावरील दौंड एसटी महामंडळाच्या एसटी बसेस वेळेत येत नसल्यामुळे विद्यार्थिनींना आर्थिक फटका बसत आहे, तसेच विद्यार्थी व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने एसटी बसेस वेळेवर सोडाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोपट खोमणे यांनी दौंड एसटी प्रशासनाला दिली आहे.दौंड येथे शिक्षणासाठी दौंडच्या पूर्व भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात एसटीने ये-जा करीत आहेत. शासनाच्या धोरणानुसार शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मोफत एसटी पास ‘मोफत शिक्षण’ योजनेंतर्गत दिले जाते. मात्र या भागातील विद्यार्थिनींना एसटी बस वेळेवर येत नसल्याने पर्यायाने खासगी सेवेचा आधार घ्यावा लागत आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून येथील विद्यार्थ्यांना एसटीच्या चुकीच्या नियोजनामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तर शाळेत वेळेत पोहोचता न आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. एसटी प्रशासनाने याबाबत दखल घेऊन एसटी बससेवा पूर्ववत करावी; अन्यथा खोरवडी ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको करण्यात येणार असल्याचा इशारा एसटी महामंडळाला दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर खोरवडीचे सरपंच सुरेखा गोसावी यांची सही आहे.
दौंड-सिद्धटेक मार्गावर एसटीचा खोळंबा
By admin | Published: January 24, 2017 1:20 AM