पुणे : वेतनवाढ मान्य नसल्याचे सांगून अघोषित बंद पुकारणाऱ्या कामगारांना साथ देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) रोजंदारी कामगारांना प्रशासनाने घरचा रस्ता दाखविला आहे. वेतन कराराशी संबंध नसताना संपात सहभागी झाल्याने सेवेतील तब्बल १ हजार १० कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केल्याची माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली. वेतन करार अमान्य असल्याचे सांगून राज्यातील एसटी कर्मचारी ८ आणि ९ जूनला संपावर गेले होते. त्यामुळे राज्यातील एसटी सेवा ठप्प झाली होती. यामुळे एसटीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. राज्यात ९ हजारांहून अधिक रोजंदारी कामगार महिना-दोन महिन्यापूर्वी सेवेत रुजू झाले आहेत. त्यांचा २०१६ ते २० च्या कामगार वेतन करारशी कोणताही संबंध नाही. त्यानंतरही १ हजार १० रोजंदारी कर्मचारी अघोषित संपात सहभागी झाले. ते कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे. त्याच कारणास्तव त्यांची एसटी महामंडळातील सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या कामगारांच्या जागी प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची नियुक्ती केली जाईल, असे एसटी प्रशासनाकडून कळविण्यात आले.
एसटीच्या संपकरी रोजंदारी कामगारांना घरचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:32 PM
कामावर विनापरवानगी गैरहजर राहिल्याने महामंडळाचा आर्थिक महसुल बुडाला. तसेच, प्रवाशांची देखील गैरसोय झाली. या प्रकारामुळे महामंडळाची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली, असा ठपका या रोजंदारी कर्मचाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
ठळक मुद्देया कामगारांच्या जागी प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची नियुक्ती