बारामती (पुणे): महाराष्ट्र शासनाच्या सेवेत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी बारामती, एमआयडीसी आगारातील कर्मचाऱ्यांचे गेल्या पाच दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरु आहे. आता संपात सहभागी असलेल्या १३ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बारामती आगार व्यवस्थापक अमोल गोंंजारी यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यानुसार शुक्रवारी(दि १२) एकुण १३ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये बारामती आगारातील ७, तर एमायडीसी आगारातील ६ कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे गोंजारी यांनी सांगितले.
बारामती येथे गेल्या पाच दिवसांपासुन एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु आहे. त्यामुळे प्रवाशी सेवा विस्कळीत झाली आहे. खासगी व्यावसायिकांकडुन प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लुट सुरुच आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार कधी, हा प्रश्न सध्यातरी निरुत्तरीतच आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या बंदचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
दरम्यान, कर्मचाऱ्यांचे निलंबन केले तरी आमची मागणी मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही. संप चालूच राहणार आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन केली आहे. समितीच्या निर्णयाचा अहवाल चार आठवडयात न्यायालयात सादर करावा लागणार आहे. तोपर्यंत आमची संपावर बसण्याची तयारी असल्याचे एसटी कर्मचारी म्हणाले.