धनकवडी : कात्रज जुना बोगदा परिसरात पुणे ते महाबळेश्वरकडे निघालेल्या एसटी बसचे इंजिन सकाळी अचानक पेट घेऊन होणारी दुर्घटना चालक व अग्निशमन जवानाच्या प्रयत्नांमुळे टळली आणि १९ प्रवाशांना दिलासा मिळाला. या घटनेत कोथरूड अग्निशमन केंद्रातील जवान योगेश चव्हाण यांच्या प्रसंगावधानामुळे १९ प्रवाशांची सुखरूप राहिले.
स्वारगेट डेपोची एसटी क्रमांक एमएच ०७, सी ९५६० वाहनचालक अंकुश शेळके व वाहक कल्पना आरमल हे पुण्यावरून महाबळेश्वरला जात असताना कात्रज घाटातील बोगद्याचा चढ चढताना इंजिन गरम झाल्याने आग लागली. कोथरूड अग्निशमन दलात रात्रपाळीत काम करणारे योगेश चव्हाण कामावरून दुचाकीने साताऱ्याला जात असताना कात्रजच्या जुन्या बोगद्याजवळ एसटीच्या केबिनमध्ये आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चव्हाण यांनी तातडीने कात्रज अग्निशमन दलाशी संपर्क केला व अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत रस्त्याने जाणाºया गाडीतील अग्निप्रतिबंधकच्या साह्याने आग विझविणयाचा प्रयत्न केला.
दरम्यान कात्रज अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व त्यांच्या साह्याने आग विजविण्यात आली. यावेळी स्टेशन प्रमुख प्रकाश गोरे, वाहनचालक जयवंत जागडे, फायरमन रमेश मांगडे, जयेश लबडे, संदीप घडशी, सागर इंगळे, तानाजी जाधव व तुषार पवार उपस्थित होते.