नीरा - एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील नीरा येथून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या असते. दररोज हजारो प्रवासी नीरा बसस्थानकातून ये-जा करतात. नीरा बसस्थानकाशेजारीच रेल्वे स्थानक आहे. काल शुक्रवारी व आज शनिवारी मोठ्या प्रमाणावर प्रवाशांनी रेल्वेने प्रवास करणे पसंत केले. त्यामुळे पॅसेंजर व कोयना एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी होत आहे.आज कोयना एक्स्प्रेसमध्ये प्रचंड गर्दी असल्याने नीरा व परिसरातील प्रवाशांना गाडीत चढणे मुश्कील झाले होते.एसटी बसला पर्याय म्हणून गेले दोन दिवस मोठ्या प्रमाणावर प्रवासी रेल्वेने प्रवास करताना दिसत आहेत. नीरा रेल्वे स्टेशनवरून सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई व नागपूर या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहेत. दिवसभरात पुण्याला व साताऱ्याला जाण्यासाठी दोन पॅसेंजर व तीन एक्स्प्रेस आहेत, तर नागपूर येथे जाण्यासाठी एक एक्स्प्रेस आहे. गेल्या दोन दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्याने नीरा रेल्वे स्टेशनच्या उत्पन्नात सरासरी १५ टक्के वाढ झाली असल्याचे प्रभारी सहायक स्टेशन प्रमुख रामनाथ मिना यांनी सांगितले.पर्याय नसल्याने रेल्वेशनिवारी नीरा बाजारपेठ शक्यतो बंद असते, त्यामुळे आठवड्याची पुण्या-मुंबईची कामे शनिवारी करतो. काल अचानक एसटी कामगारांनी बंद पुकारला नियोजित कामे वेळेत न झाल्याने दंड सोसावा लागतो.त्यामुळे प्रवास करणे भाग आहे. नीरेकरांना एसटीला रेल्वे पर्याय असल्याने वेळ जादा गेला, तरी कामे होतात त्यामुळे आज रेल्वेने प्रवास करत आहे, असे मत व्यापारी वर्धमान शहा यांनी व्यक्त केले.रेल्वे पोलिसांची कुमक वाढवलीगेल्या दोन दिवसांत एसटी प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय निवडला आहे. रेल्वे गाड्यांना होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेतली आहे.रेल्वे प्रशासनानेदेखील एसटी संपाची दखल घेऊन सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांची कुमक वाढवली आहे. अशी माहिती घोरपडी आर.पी.एफचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल मोरे यांनी दिली.भोरला लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांची वाहतूक बंदभोर : विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेच्यावतीने आज दुसºया दिवशीही संप सुरूच आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांची वाहतूक बंद आहे. शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेचे १६ कर्मचारी कामावर आल्याने ८ गाड्या सुरू आहेत. यामुळे ग्रामीण भागातील वाहतूक काही प्रमाणात चालू आहे. यामुळे अगोदरच तोट्यात असणारे आगार अधिकच तोट्यात जात आहे.दरम्यान, शुक्रवारी रात्री भोरवरून म्हसर बुद्रुक या गावी मुक्कामी एसटी गाडीच्या काचा फोडल्याने एसटी कर्मचाºयांनी अज्ञातांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वगळता संप शांततेत सुरू आहे. मात्र गाड्या बंद असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.एसटी कर्मचाºयांचा पगारवाढीचा करार फसवा असून किती पगारवाढ होणार आहे, समजत नाही. कनिष्ठ कर्मचाºयांना न्याय मिळणार नाही, वेतनवाढीचा दर ३ टक्क्यांवरून २ टक्के केल्याने वेतनवाढीची रक्कम कमी होणार आहे. अशा विविध मागण्यांसाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून एसटी कामगार संघटनेच्यावतीने संप सुरू आहे.या संपात कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन जेधे, संघटनेचे तालुकाध्यक्ष नीलेश पिलाणे, सचिव सचिन जाधव, कृती समितीचे अध्यक्ष गणेश मळेकर व सर्वच संघटनांचे मिळून ३०० पैकी २७० कर्मचारी सहभागी झाले आहेत.दरम्यान, शिवसेना कामगार संघटनेचे काही कर्मचारी कामावर असल्यामुळे डेपोतील ६० पैकी ९ गाड्या सुरू आहेत. लांब पल्ल्याच्या मुंबई, बोरिवली, पुणे, नाशिक, कोल्हापूर, शिर्डी, पंढरपूर या गाड्या बंद आहेत. ८ गाड्या सुरू असल्याने काल ग्रामीण भागातील ३८०० किलोमीटर प्रवास झाला असून आज ८ गाड्या व १६ कर्मचारी कामावर असल्याने पुणे ४ फेºया, शिरवळ ३ फेºया, कारी २, वीर २, पांगारी, रायरी, म्हसर बु, जेजुरी, कोर्ले, भुतोंडे, वाल्हे, मळे प्रत्येकी एक फेºया होऊन सुमारे २५०० किलोमीटरचा प्रवास झाला आहे. मात्र संप वगळता एसटीचा दररोज २१ हजार किलोमीटरचा प्रवास होतो. संपामुळे सुमारे १८ हजार किलोमीटरचा प्रवास कमी झाला आहे.दोन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी एसटी कामगार संघटनेचे कर्मचारी संपात सहभागी झाले असून त्यांना इतर संघटनांनी साथ दिली आहे. त्यामुळे ३०० पैकी २७० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या बंद असून सुट्या संपल्याने गावातील नागरिक प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. संप शांततेत सुरू आहे.
एसटीचा लोंढा रेल्वेकडे, कोयना एक्स्प्रेस व पॅसेंजरला गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:29 AM