लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसर रेल्वे स्थानकावर स्टेबलिंग लाईन व फलाट क्रमांक दोन व तीनचे विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ‘ओएचई’च्या कामालाही सुरुवात होईल. हडपसर टर्मिनल अंतर्गत सुरू असलेल्या पहिल्या कामाचा टप्पा आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. या ठिकाणी दोन नव्या स्टेबलिंग लाईनसह लूप लाईनदेखील तयार केले जाणार आहे.
हडपसर रेल्वे स्थानकावर टर्मिनल्स तयार करण्याचे काम सुरू आहे. दोन टप्प्यात हे काम पूर्ण होणार आहे. सध्या पहिल्या टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हडपसर स्थानकावरील फलाट एकचे विस्तारीकरण पूर्वीच झाले आहे. फलाट दोन व तीनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोनाची लागण व संचारबंदीमुळे या कामास विलंब लागला.
स्टेबलिंग लाईनची आवश्यकता काय?
रेल्वे (रेक) उभी करण्यासाठी स्टेबलिंग लाईनची आवश्यकता असते. टर्मिनसहून गाड्या सुटतात आणि तिथेच प्रवासाचा शेवट होतो. त्यामुळे सुटणाऱ्या गाड्याचा रेक थांबून ठेवण्यासाठी स्टेबलिंग लाईनची आवश्यकता असते. या ठिकाणी स्टेबलिंग लाईन व लूप लाईन तयार केली जाईल.
हडपसर टर्मिनलचा फायदा काय?
पुणे रेल्वे स्थानकावरून रोज सुमारे २१३ रेल्वे धावतात. यातील ४०हून अधिक गाड्यांचे देखभाल-दुरुस्तीचे काम पुणे स्थानकावरील यार्डामध्ये केले जाते. यासाठी आवश्यक पिट लाईन, स्टेबलिंग लाईनची संख्या अपुरी पडत आहे. शिवाय, फलाटदेखील व्यस्त असल्याने अनेक गाड्यांना १० ते २० मिनिटे होम सिग्नलवर थांबून रहावे लागते. हडपसर टर्मिनलमुळे तीन स्टेबलिंग लाईनचा प्रश्न मिटेल. त्यामुळे काही गाड्या पुणे स्थानकावरून थेट न सुटता हडपसर टर्मिनलवरून सुटतील. त्यामुळे पुणे स्थानकावरचा वाहतुकीचा ताण हलका होण्यास मदत होईल.
आता फलाट ७५० मीटर लांबीचे
हडपसर स्थानकावर पूर्वी ३३० मीटर लांबीचे फलाट होते. त्यामुळे केवळ १२ डब्यांची रेल्वे थांबू शकत होती. मेल एक्स्प्रेस, सुपर फास्ट गाड्या या २४ डब्यांच्या असतात. त्यामुळे अशा गाड्यांना हडपसर स्थानकावर थांबविले जाऊ शकत नव्हते. फलाटाचे विस्तारीकरण करून ते आता ७५० मीटर लांबीचे करण्यात येणार आहेत. त्यामुळे २४ डब्यांची गाडी दोन इंजीनसह थांबू शकेल इतके लांबीचे फलाट बनविण्यात येणार आहे.
कोट : हडपसर टर्मिनलचे पहिल्या टप्प्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. फलाटाच्या विस्तारीकरणासोबत अन्य कामेही सुरू आहेत. लवकरच ‘ओएचइ’च्या कामास सुरुवात होईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, पुणे.