पुणे : क्रिकेट व इतर खेळाच्या सट्टेबाजीसाठी लागणारे सॉफ्टवेअर तयार करून सट्टेबाजांना २५ लाखांना विक्री करणाऱ्या बुकीला गुन्हेशाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, या आरोपीकडून मुंबई पोलिसांनी सट्टेबाजीत जप्त केलेला मोबाईल नंबर हा सिमकार्ड कंपनीला चुकीची माहिती व कागदपत्रे देऊन पुन्हा सुरू केल्याचे उघडकीस आले आहे. न्यायालयाने त्याला ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.एकाक्ष राजेंद्रकुमार जैन (वय ३३, रा. खराडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या घरातून ११ लाख ९२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. तसेच, त्याचे लॅपटॉप, वेगवेगळ्या कंपनीचे २७ मोबाईल, वेगवेगळी १२ सिमकार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायदा व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील गवळी यांनी फिर्याद दिली आहे. जैन याने क्रिकेट व इतर खेळासाठी सट्टेबाजीचे सॉफ्टवेअर तयार केले व ते २५ लाखांना विकून, तसेच सॉफ्टवेअर चालवून सट्टेबाजांबरोबर आर्थिक फायदा घेत होता. तसेच, स्वत:च्या घरातून इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा गैरवापर करून बेकायदेशीर सट्टेबाजी करीत होता. त्यास न्यायालयात हजर केले असता, सरकारी वकील ए. के. पाचरणे आणि पोलीस निरीक्षक सुषमा चव्हाण यांनी त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या प्रकरणात दुबई येथे असलेल्या एका व्यक्तीचाही सहभाग असल्याची माहिती मिळाल्याने आरोपीचा आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये समावेश असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्याच्याकडून जप्त केलेले २७ मोबाईल आणि १२ सिमकार्डबाबत तपास करणे आणि त्याला सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी कोणी मदत केली याबाबत तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्यात आली. (प्रतिनिधी)
सट्टेबाजीचे सॉफ्टवेअर तयार करणा-यास अटक
By admin | Published: October 06, 2014 6:29 AM