पुणे : खराडीतील लसीकरण केंद्र सुरू करताच मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मात्र अपुऱ्या जागेमुळे तसेच कर्मचारी संख्येमुळे यंत्रणेवर ताण वाढला होता. त्यामुळे कर्मचारी वाढविण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार ओपीडी आणि लसीकरण केंद्रासाठी वेगळा कर्मचारी वर्ग नेमण्यात आला आहे. लसीकरण केंद्राचा वाढता प्रतिसाद बघता केंद्र अपुरे पडत आहे. याची जाणीव आहे. त्यामुळे आणखी दोन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे, असे नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
लोकप्रतिनिधी, स्थानिक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मागणीनुसार खराडीत लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. पहिल्याच दिवशी नागरिकांनी मोठा प्रतिसाद या मोहिमेला दिला. मात्र जागा आणि कर्मचारी अपुरे पडत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. लसीकरणासाठी पाच कर्मचारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे एकूण त्यामुळे पाच कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली असून कर्मचारी संख्या दहा करण्यात आली आहे. यामुळे यंत्रणेवरील ताण हलका झाला असून लसीकरणाला लागणारा वेळ कमी झाला आहे. त्यामुळे नागरिक सुखावले आहेत.