पिंपरी : सोमवारपासून (दि.५) हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कर्मचारी, आचारी यांची मर्यादित संख्या हॉटेल व्यवसायिकांसमोरील मोठे आव्हान ठरणार आहे. जिल्ह्यातील अडीच लाख कर्मचाऱ्यांपैकी अवघे २५ हजार कर्मचारी उपलब्ध असून, आवश्यकतेनुसार कर्मचारी उपलब्ध होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागू शकतो अशी प्रतिक्रिया दिली.
कोरोनामुळे (कोविड १९) जाहीर केलेल्या टाळेबंदीमुळे सहा महिन्याहून अधिक काळ हॉटेल, रेस्टॉरंट आणि बार बंद होते. सोमवारपासून हॉटेल पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पुणे जिल्ह्यात १३ ते १४ हजार लहान मोठी हॉटेल आणि रेस्टॉरंट आहेत. तर, बारची संख्या सत्तावीसशे आहे. जिल्ह्यामध्ये अडीच लाख कामगार असून पन्नास टक्के क्षमता गाठेपर्यंत एक महिना वेळ लागेल.
हॉटेल कलासागरचे व्यवस्थापकीय संचालक अशोक भोसले म्हणाले, हॉटेलचा आकार आणि श्रेणी नुसार प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत. माझ्याकडे कोविडपूर्वी वीस गढवाल आणि कोलकाता येथील आचारी (कुक) होते. आता केवळ एक आहे. विविध विभाग प्रमुख दहा होते. आता केवळ एकच आहे. हॉटेल आवारातील बागकामासाठी देखील कर्मचारी उपलब्ध होत नाही. तारांकित आणि विविध खंडातील खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या हॉटेलमध्ये दहा टक्के कामगार महाराष्ट्रातील आहेत.
पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद पानसरे म्हणाले, हॉटेल, रेस्टॉरंट मध्ये श्रेणीनुसार सरासरी चाळीस टक्के कर्मचारी स्थानिक आहेत. बिहार, उत्तरप्रदेश आणि बंगाल येथील कर्मचारी जास्त आहेत. कर्मचारी माघारी येण्यास वेळ लागेल.
------------मोठ्या हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये गढवाल आणि कोलकाता येथील कुक आणि कर्मचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात कोरोनाचा प्रसार वाढल्याने बरेचसे कर्मचारी आपल्या गावी गेले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासाची साधने उपलब्ध नासल्याने त्यांना येणे अडचणीचे ठरत आहे.
अशोक भोसले, हॉटेल व्यावसायिक
--------हॉटेल उद्योगात सरासरी चाळीस टक्के कर्मचारी महाराष्ट्रातील आहेत. मात्र, दाक्षिणात्य, खंडीय खाद्यपदार्थ (कॉंटिनेंटल फूड), उत्तर भारतीय, पंजाबी, चायनीज या हॉटेल श्रेणी प्रमाणे कुक आणि कर्मचारी संख्या बदलते. गढवाल बिहार आणि कोलकता येथील कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यात अडीच लाख कर्मचारी काम करतात. त्या पैकी पंचवीस हजार सध्या उपस्थित आहेत. महिना अखेरी पर्यंत ही संख्या एक लाखा पर्यंत जाईल.
गणेश शेट्टी, अध्यक्ष पुणे जिल्हा हॉटेल, रेस्टॉरंट अँड बार असोसिएशन