पुणे : पालिकेच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या विरोधी पक्षानेत्यांना यावे लागते हे सत्ताधारी भाजपाचे अपयश आहे. निवडणुका वर्षभरात येऊन ठेपल्याने भाजपाला विकासकामांची जाग आल्याचा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला आहे.
पुण्यात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीष बापट, आणि सहा आमदार, पालिकेत एकहाती सत्ता आणि ९८ नगरसेवक असताना गेल्या चार वर्षांत एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही. समान पाणीपुरवठा योजना भाजपा नगरसेवकांमुळे अडली. जायका प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मोठ्या थाटात केले. परंतु याला अद्यापही सुरुवात झालेली नाही. नदीवरील पुलासाठी लाखो रुपये खर्च करून विविधरंगी दिवे बसविण्यात आले. परंतु, नदीतील गटाराचे दुर्गंधीयुक्त पाण्याचे काय करायचे, असा प्रश्न आहे. सहा मीटर रस्त्याचे रंदीकरण करुन नऊ मीटर रस्ते करून मोजक्या बिल्डरांचा फायदा होण्यासाठी घातलेला घाट आहे.