अमोल अवचिते
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधक गट-ब या पदाची स्पर्धा परीक्षेद्वारे भरती केलेली नाही. हे पद महसूल विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे पद आहे. सन १९९५ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत शेवटची स्पर्धा परीक्षेद्वारेे याची भरती झालेली आहे. त्यामुळे या पदाची जाहिरात काढावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येमुळे शासनातील विविध विभागांवर कामाचा ताण वाढला आहे. असे असतानादेखील महत्त्वाच्या विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सरकारकडून राबविली जात नाही. दुसरीकडे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी नोकरी मिळावी म्हणून डोळे लावून बसले आहेत. या विभागात एकूण ६०० पदे असून त्यापैकी नियमानुसार ३०० पदे स्पर्धा परीक्षा घेऊन भरणे अनिवार्य आहे. मात्र या पदाचे मागणीपत्रच काढले जात नाही. या पदाबाबत मोठ्या आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे प्रकार घडतात, अशी चर्चा होत असते. असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
या विभागावर कामाचा अतिरिक्त ताण वाढत चालला असून अतिरिक्त कार्यभार सोपवून, तात्पुरती पदोन्नती देऊन कार्यभार चालविला जात आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अनेक कार्यालयांचा भार आहे. नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत. तसेच या विभागात अनेक वेळा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे, असा आरोपही विद्यार्थ्यांनी केला.
कोट
या विभागाची जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करून महाराष्ट्र लोकसेवा आायोगाकडून (एमपीएससी) भरती प्रक्रिया राबवावी. यामुळे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या विभागातील पदासाठी संधी मिळेल. तसेच विभागाच्या कार्यक्षमतेवर निश्चितच सकारात्मक परिणाम होईल.
- नीलेश जाधव, परीक्षार्थी
एमपीएससी ने २०१३ मध्ये या पदभरतीला मान्यता दिली होती. मात्र ६ वर्षांमध्ये कोणतीही कार्यवाही झाली नाही. जर भरती झाली तर ३०० विद्यार्थ्यांना संधी मिळेल. यावर राज्य सरकारने विचार करण्याची गरज आहे. या भरतीबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.
- महेश बडे, प्रमुख, एमपीएससी स्टुडंट्स राईट्स
चौकट
१९९५ पासून या पदांची जाहिरातच नाही आली
- पुरवठा निरीक्षक, अन्न व नागरी पुरवठा विभाग.
- कामगार निरीक्षक व वजन मापे निरीक्षक, अन्न व नागरी पुरवठा विभाग.
- अन्न निरीक्षक, अन्न व नागरी पुरवठा विभाग.
- कारखाने निरीक्षक, कामगार विभाग.
- दुय्यम निबंधक, नोंदणी व मुद्रांक विभाग.