पुणे : काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या क्रीडा समितीला डावलून अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या विषयाला स्थायी समितीत मंजुरी करून घेतलीच. या स्पर्धेच्या खर्चावरून समितीच्या बैठकीत बरीच खडाजंगी झाली. अखेरीस १ कोटी ८३ लाख खर्च करण्यास स्थायीने मंजुरी दिली. क्रीडा समितीने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.पालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्तीस्पर्धेत १९ देशांमधील संघ सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. स्पर्धेच्या संयोजनासाठी पालिकेला राष्ट्रीय कुस्ती तालीम संघाने साह्य केले आहे. ५ ते ९ आॅक्टोबर दरम्यान खराडी येथील कै. विठोबा मारुती पठारे स्टेडियमवर ही स्पर्धा होणार आहे. हा विषय क्रीडा समितीकडून स्थायी समितीत व नंतर सर्वसाधारण सभेत येणे अपेक्षित असताना सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने तो थेट स्थायीत आणला. त्यामुळे क्रीडा समितीच्या अध्यक्ष शीतल सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत स्थायी समितीच्या बैठकीत मंगळवारी या विषयाला मान्यता देण्यात आली. एकूण १ कोटी ८३ लाख रूपयांच्या खर्चापैकी १४ लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे. राज्यातील खेळाडूंना, तर राज्यातील खेळाडूंना बक्षिसासाठी ३३ लाख रुपये आहेत. लाइट व्यवस्थेसाठी १५ लाख, जाहिरातीसाठी ५ लाख, मंडपासाठी १५ लाख रुपये, व्हिडिओ शुटिंग आणि फोटोग्राफीसाठी ११ लाख ८६ हजार, असे खर्चाचे वर्गीकरण आहे. खेळाडूंच्या निवास, भोजन आणि प्रवासखर्चासाठी ७५ लाख रुपयांचा खर्च होईल. दरम्यान, महापौर प्रशांत जगताप यांनी या स्पर्धेच्या पूर्वतयारीची पाहणी केली. स्पर्धेच्या दृष्टीने आवश्यक ती कामे पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या. नगरसेवक महेंद्र पठारे, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप, माजी आमदार बापू पठारे आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवन व कलामंदिरासाठी १४ कोटी, वडगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजीराजे भोसले सांस्कृतिक भवन व कलामंदिर बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्याचा विषयही समितीपुढे होता. या कामाची १४ कोटी ८ लाख ४४ हजार रुपयांची निविदा मंजूर करण्यात आली, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके यांनी दिली.
कुस्ती स्पर्धेवरून स्थायी समितीत खडाजंगी
By admin | Published: October 05, 2016 1:50 AM