वाघोली : कोलवडी येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारा एक जण सोसायटीत राहणाऱ्या महिलांना फोन करून त्रास देणे अश्लील शेरेबाजी करणे तसेच गॅलरीत अंडरवेअर वर उभे राहणे, महिलांकडे वाईट नजरेने पाहणे अशी तक्रार सोसायटीतील महिलांनी पोलिसांकडे केली होती. त्याला न्यायालयाने २४ तासाच्या आतच खटला चालवून दहा हजार रुपयांचा दंड आणि तक्रारदारास पाच हजार रुपयांची नुकसान भरपाई अशी शिक्षा ठोठावली. सिद्धेश्वर बिरादार,(वय ३० वर्षे)रा.कोलवडी असे आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोलवडी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहणारा सिध्देश्वर बिरादर याच्या विरोधात सोसायटीतील महिलांनी तक्रार केली होती. लोणीकंद पोलिसांनी ही तक्रार अतिशय गांभीर्याने घेत तातडीने तपास करुन चोवीस तासात तपास पूर्ण २५ मार्च रोजी शिवाजीनगर न्यायालयात दोषारोप दाखल केला. यातील फिर्यादी, साक्षीदार न्यायालयात हजर राहून साक्ष दिल्यानंतर न्यायालयाने २४ तासात खटला चालविला. आरोपीने गुन्हा कपूल केल्याने आरोपी सिद्धेश्वर बिरादार याला दहा हजार रुपये दंड तसेच कोर्ट उठेपर्यंत न जाण्याची शिक्षा व फिर्यादी यांना नुकसान भरपाई म्हणून पाच हजार रुपये तसेच दंड न भरल्यास ११ दिवसांचा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली.
या गुन्ह्याचा तपास हिम्मत जाधव,पोलीस उपायुक्त येरवडा विभाग झोन चार, प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग,वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार,लोणीकंद पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया पंडित वंजारी यांनी केला असून पोलीस शिपाई आशिष लोहार,विठ्ठल केदारी यांनी या कामी सहकार्य केले आहे.