पुणे : पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, असा टाहो फोडत रेव्हेन्यू कॉलनीतील पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी रविवारी सकाळी महापौर निवासस्थानाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. महापौर तसेच खासदार आयुक्त यांची बैठक संपेपर्यंत त्यांनी महापौर निवासस्थानातच ठिय्या दिला. महापौरांनी त्यांना रविवारी सायंकाळी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. ते त्यांनी लेखी मागितल्यामुळे पुन्हा थोडा गोंधळ झाला.सलग १५ दिवस पाण्याचा त्रास सहन करत असल्याची या महिलांची तक्रार होती. वारंवार आश्वासन देऊनही पाणी मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याच तक्रारीची दखल घेत खासदार अनिल शिरोळे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी त्यांना रविवारी सकाळी बैठक घेण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे रविवारी ही बैठक झाली. खासदार अनिल शिरोळे आयुक्त सौरभ राव, स्थानिक नगरसेवक नीलिमा खाडे, सिद्धार्थ शिरोळे, ज्योत्स्ना एकबोटे, स्वाती लोखंडे, पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम बैठकीला उपस्थित होते.बैठक सुरू होण्यापूर्वीच रेव्हेन्यू कॉलनीतील महिला तसेच पुरुषांनाही महापौर निवासस्थानी ठाण मांडले होते. हातात बादली व स्टीलचा ग्लास घेऊन ते आले होते. त्यांनी घोषणा सुरू केल्या. हक्काचे पाणी पळवू नका, महापौर, आम्हाला पाणी द्या. उद्याची आंघोळ महापौरांच्या निवासस्थानी, अशा घोषणा ते देत होते. बादली वाजवत ते देत असलेल्या या घोषणांच्या पार्श्वभूमीवरच महापौर टिळक यांचे तिथे आगमन झाले. त्यामुळे अधिक जोरात घोषणा सुरू झाल्या.महापौर आत गेल्यानंतर बैठक सुरू झाली. ती तब्बल दोन तास चालली. तेवढा वेळ सर्व आंदोलक बसून होते. आपल्याला कोणी पाणीही विचारले नाही, हे लक्षात आल्यानंतर तर त्यांचा संताप अनावर झाला. महापौर बंगल्यावर नागरिकांना प्यायला पाणीही देत नाही का, म्हणून त्यांच्यातील वयोवृद्धांनी ओरड सुरू केली. अखेर बºयाच वेळाने एकजण पाण्याचा कॅन घेऊन आला. पण त्याला वेळ लागला म्हणून ते पाणी आम्ही कोणीच पिणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली. बैठक लांबल्यामुळेही आंदोलक चिडले. त्यांच्यातील महिलांनी नगरसेवकांना फोन करून त्वरित बाहेर या, नाहीतर आम्ही आत येऊ, असा इशारा दिला.त्यामुळे ज्योत्स्ना एकबोटे व नीलिमा खाडे बाहेर आल्या व त्यांनी आंदोलकांची भेट घेतली. बैठक संपली की सगळेच बाहेर येऊन तुमच्याशी बोलतील, असे त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे बैठक संपल्यांवर महापौर टिळक यांनी सर्व आंदोलकांना त्यांच्यासाठी आजच (रविवारी) सायंकाळी पाणी सोडणार असल्याचे स्पष्ट केले. कशामुळे अडचण झाली होती, याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. पाइपलाइन फुटली तर ती दुरूस्त करण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ जातो, त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तसे झाल्यामुळेच तुम्हाला पाणी मिळाले नाही. मात्र आता एसएनडीटी जवळच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जाईल. खासदार शिरोळे म्हणाले, महापौर व आयुक्त यांच्यावर संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी आश्वासन दिले आहे, ते पूर्ण होईल, याची मला खात्री आहे.आम्ही कर भरतो, आमच्या हक्काचे पाणी द्याचुकीचे बोलते आहे असे वाटेल, पण खूप कमी दाबाने पाणी येते आमच्याकडे. ते भरायचे कसे? गेले १५ दिवस असेच हाल सुरू आहेत. मी ७६ वर्षांची आहे. दुसºया मजल्यावर राहते. तिथपर्यंत पाणी यायचे. आता तिथेही नाही व खालीही नाही, अशी स्थिती झाली आहे.- विजया धर्माधिकारीमहापौर निवासस्थानी भरपूर पाणी असेल. त्यांची कधीच काहीच अडचण होत नाही. सामान्यांच्या घरांमध्ये जाऊन पाहावे. पाणीआले नाही तरी सगळेठप्प होऊन जाते. नियमितपणे कर जमा करत असूनही हा त्रास कशासाठी!- शिरीष कामदारआम्ही कर जमा करतो. आमच्या हक्काचे पाणी आहे. सर्व जबाबदार व्यक्तींना भेटल्यानंतरही समस्या सूटत नाही. हे बरोबर नाही. कोणी लक्षही द्यायला तयार नाही. पाणी वेळेवर नियमित व पुरेशा दाबाने मिळालेच पाहिले.- डॉ. सुकुमार देशमुखहातात ग्लास व बादली घेऊन आम्ही आलो आहोत, यावरून आमची समस्या किती त्रासदायक असेल याचा विचार करा. सांगितलेल्या वेळेत पाणी मिळाले नाही तर खूप हाल होतात. यांना त्याचे काहीच वाटत नाही.- विक्रम अवसरीकर
पाण्यासाठी महापौरांच्या बंगल्यासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 3:51 AM