रहाटणी : एप्रिल ते जून महिन्यादरम्यान कावळ्यांची प्रजनन प्रक्रिया सुरू असते अर्थात त्यांच्यासाठी हा विणीचा काळ असतो. या काळात कावळ्याची मादी घरटे तयार करून अंडी घालत असते. पिंपळे सौदागर आणि रहाटणी परिसरात झाडांवर कावळ्यांची काही घरटी आहेत. त्यांतील काही लोखंडी तारांपासून तयार केली आहेत. गवताच्या काड्या आणि काटक्या न मिळाल्याने कावळ्यांनी मिळेल त्यापासून घरटे बनविल्याचे दिसून येते.पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या माणसाचे जगणे कधी यंत्रासारखे झाले हे कळलेच नाही. पोटाची चिंता मिटली, की घराची चिंता सतावते. त्यातूनच शहरांचा उदय झाला. त्याची महानगरे झाली. याचा फटका मुक्या जिवांना बसला. त्यांचे खाद्य बदलले, निवाºयाचा प्रश्न उपस्थित झाला. माणूस झोपडीतून काँक्रीटच्या घरात आला.शेतीचे क्षेत्र कमी झाले आणि काँक्रीटचे जंगल वाढू लागले. पशू-पक्षीही त्यात हरवले. या काँक्रीटच्या जंगलात आपले घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी पै-पै जमा केली जाते. पक्षीही अशाच पद्धतीने घरटे साकारतात. अडचणींवर मात करीत कावळ्यांनी तारांचा वापर करून घरटे तयार केले आहे. सिमेंटच्या या जंगलात जणू माझेही पक्के घरटे आहे, असाच संदेश कावळा देत असावा.छोटेखानी का होईना मात्र आपल्या हक्काचे एक घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पक्षीही असेच स्वप्न बाळगतात आणि पूर्णही करतात. घरटे तयार करण्यातील त्यांचे कसब पाहून त्यांना निसर्गातील वास्तुविशारद म्हणतात. कावळा त्यांपैकीच एक. गवताच्या काड्या, काटक्यांपासून घरटे बनवून त्यात कापूस ठेवून कावळा घराचे स्वप्न पूर्ण करतो. उंच झाडावर गवताच्या काड्या आणि काटक्यांनी बनविलेले घरटे आपल्या नजरेस येते. मात्र शहरात काटक्या मिळत नसल्याने कावळ्यांना लोखंडी तारांनी घरटे बनविण्याची वेळ आली आहे.जमिनीला सोन्याचा भाव आल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील जमीनमालकांनी जमिनी विकण्याचा सपाटा लावला आहे. जागा मिळेल तेथे गगनचुंबी इमारती उभारण्यात येत आहेत. त्यामुळे शहरातील पक्ष्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. पक्ष्यांना दाना-पाणी मिळत नसल्याने अनेक पक्षी शहरातून स्थलांतरित झाले आहेत. मात्र आहे त्या पक्ष्यांना त्यांच्या अन्नासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. घरट्यासाठी माणसांप्रमाणे त्यांनाही झगडावे लागत आहे. पक्ष्यांना घरटे बनविण्यासाठी गवताच्या काड्या किंवा काटक्या आवश्यक असतात. मात्र, शहरात शेती शिल्लक राहिली नाही. त्यामुळे गवत आणि काटक्या उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पक्ष्यांनाही घरटे बनविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी त्यांनीही बदलत्या युगाबरोबर बदलण्याचे ठरविले की काय असे वाटत आहे. कारण कावळे सध्या काटक्यांनी नव्हे, तर लोखंडी तारांनी आपले घरटे बनवीत आहेत. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने घरटे तयार करण्यासाठी त्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.काही दशकांपूर्वी शेतकरी कावळ्याच्या घरट्यावरून पावसाचा अंदाज लावीत असत. जर कावळ्याचे घरटे झाडाच्या टोकाला असेल, तर त्या वर्षी पाऊस कमी होणार व घरटे झाडाच्या मध्यभागी असेल तर पाऊस भरपूर होणार, असे ठरविले जात असे. त्यानुसार शेतकरी हंगामाचे नियोजन करीत असत. मात्र शेती कमी झाली आणि झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यामुळे घरटे तयार करण्यासाठी कावळ्यांची मोठी अडचण निर्माण झाली.
कावळ्यांचे काटक्यांऐवजी तारांचे घरटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 2:12 AM