परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्समधील कामगिरी लक्षात घेऊन स्टार्स प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आलेली आहे.राज्य मंत्रिमंडळाने स्टार्स प्रकल्पाच्या अंमलबजावणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा ६० टक्के, तर राज्य शासनाच्या ४० टक्के याप्रमाणे निधीचे प्रमाणही निश्चित झाले आहे. त्यानुसार केंद्र शासनाद्वारे सन २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी २५ कोटी ७ लाख रुपये निधी राज्य शासनास वितरीत केला आहे. राज्य हिस्सा १६ कोटी ७१ लाख ६६ हजार रुपये इतका आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीच्या वर्गामध्ये दर्जेदार शिक्षण देणे व अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या पद्धतीत व मूल्यमापन पद्धतीत सुधारणा करणे आदी या बाबींचा समावेश करुन शिक्षण क्षेत्रात मूलभूत सुधारणा करण्यासाठी स्टार्स प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. इयत्ता सहावीपासून व्यवसाय शिक्षणाचे बळकटीकरण करून त्यात सुधारणा करण्याचा अंतर्भाव या योजनेत केला आहे.