--
केडगाव : दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची आमदार राहुल कुल यांनी भेट घेतली. या वेळी रेल्वेमंत्र्यांच्या निर्देशाने 'दौंड-पुणे-लोणावळा' रेल्वे मार्गावर मेनलाइन इलेक्ट्रिकल मल्टिपल युनिट ट्रेन (मेमू) सुरु करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. याद्वारे दौंड-पुणे इलेक्ट्रिक लोकलचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. दौंड-पुणे दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा देणाऱ्या व गेले अनेक वर्षे प्रलंबित असणारा हा विषय मार्गी लावल्याबद्दल माननीय रेल्वेमंत्री महोदयांचे आभार मानले.
दौंड तालुक्यातून जाणाऱ्या प्रमुख राज्यमार्ग व प्रमुख जिल्हामार्गांवर सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असणाऱ्या रेल्वेच्या विविध ८ रेल्वे क्रॉसिंगवर रोड ओव्हरब्रिज व रोड अंडर ब्रिज बांधण्यात यावेत. दौंड शहरातील रेल्वे हद्दीमध्ये राहणाऱ्या सुमारे ६७० झोपडपट्टीधारक कुटुंबीयांच्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी रेल्वेच्या सहभागाने रेल्वे हद्दीमध्ये अतिक्रमण करून राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अल्प उत्पन्न गटातील, मागास व भूमिहीन नागरिकांसाठी 'प्रधानमंत्री आवास योजना' राबविण्यात यावी. तसेच दौंड रेल्वे कॉर्ड लाइन स्टेशन पूर्णपणे विकसित व प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधांचा उपलब्ध होईपर्यंत दौंड नगर मार्गावरील सर्व प्रवासी रेल्वेगाड्यां दौंड स्टेशनवर थांबविण्यात याव्यात. तसेच दौंड कॉर्ड लाइन स्टेशनवर सध्या ५ मिनिटांचा अल्प थांबा वाढविण्यात यावा. विनाआरक्षित रेल्वे प्रवास सर्वांसाठी लवकरच खुला करावा तसेच दौंड-पुणे प्रवाशांची भविष्यातील गरज ओळखून दौंड-पुणे लोकलच्या १२ फेऱ्या करण्यात याव्यात. या मागण्यांची दखल घेऊन सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन माननीय रेल्वेमंत्री गोयल यांनी दिले.
--
फोटो क्रमांक : १२ केडगाव रेल्वेमंत्री भेट
दौंडच्या रेल्वेसंबधी प्रलंबित प्रश्नांचे रेल्वेमंत्री गोयल यांना निवेदन देताना आमदार राहुल कुल.