घोडेगाव (पुणे) :आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील पूर्व भागात काही गावांमध्ये अतिशय कमी पाऊस पडला असून, येथील जनावरांसाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी शासनाने चारा छावण्या सुरू करा, अशा सूचना राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
आंबेगावजुन्नर तालुक्यातील पूर्व भागात अनेक गावांमध्ये सरासरीपेक्षा २० टक्के पाऊस झाला आहे. येथील काही गावांमध्ये अजूनही पिण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत, तसेच पाऊस कमी पडल्याने नवीन चारा निर्माण झाला नाही. त्यामुळे या गावातील लोकांनी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे. घोडेगाव येथे झालेल्या आढावा बैठकीत वळसे पाटील यांनी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार संजय नागटिळक यांच्याकडून झालेल्या पावसाची आकडेवारी व दोन तालुक्यांतील परिस्थिती समजून घेतली.
पावसाची परिस्थिती पाहता, खरोखर या वर्षी दर वर्षीच्या तुलनेत फार कमी पाऊस पडला आहे. पुढे पाऊस झाला नाही, तर गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे, हे लक्षात घेता, शासनाने आत्तापासून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, तसेच चाऱ्याची गंभीर परिस्थिती निर्माण असलेल्या गावांमध्ये चारा छावण्या सुरू केल्या जाव्यात, अशा सूचना वळसे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या, तसेच याबाबतचे प्रस्ताव प्रांत अधिकारी यांनी बनवून वरिष्ठ कार्यालयात तत्काळ मंजुरीसाठी पाठवावे, असे त्यांनी सांगितले.