पुणे : पीएमपीमधील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणीनुसार देण्यात येणाऱ्या फरकाची रक्कम निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांना देण्यास सुरुवात झाली आहे. या फरकाची रक्कम मिळूनही पीएमपीकडे वेतनासाठी पैसे नसल्याने सुमारे २,५०० निवृत्ती वेतनधारकांची रक्कम पीएमपीकडून अद्याप देण्यात आलेली नव्हती. हा प्रकार ‘लोकमत’ने ‘निवृत्ती वेतनधारक वाऱ्यावर’ या वृत्ताद्वारे समोर आणताच खडबडून जाग्या झालेल्या पीएमपी प्रशासनाने मंगळवारपासूनच (दि. ८) या धनादेशाचे वाटप सुरू केले आहे.पीएमपी कर्मचाऱ्यांंच्या सुधारित वेतन करारानुसार, दोन्ही महापालिकांनी वेतन फरकाचे २७० कोटी रुपये ३ टप्प्यांत देण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानुसार २०१४ ते २०१५ या वर्षात ९० कोटी रुपये देण्याचा ठराव दोन्ही महापालिकांमध्ये मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये पुणे महापालिका ५० कोटी, तर पिंपरी-चिंचवड महापालिका ४० कोटी रुपये देणार आहे. दोन्ही महापालिकांनी २०१४मध्ये फरकाचे ९० कोटी रुपये दिले होते. तर, गेल्या वर्षी निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूदही करण्यात आली होती. मात्र, वर्ष संपून नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरही निधी देण्यात आला नव्हता. मागील महिन्यात हा निधी दोन्ही महापालिकांनी पीएमपीकडे वर्ग केला आहे. त्यानंतरही काही दिवस कर्मचारी संघटनांच्या सदस्य फीच्या वादामुळे निधी थांबविण्यात आला होता. त्यानंतर कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेताच, सध्या पीएमपीच्या सेवेत असलेल्या तब्बल आठ हजार कर्मचाऱ्यांना पीएमपीने फरकाची रक्कम तातडीने दिली. मात्र, निवृत्ती वेतनधारकांचे अडीच हजार धनादेश तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्याचे सांगून या निवृत्ती वेतनधारकांना रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. अखेर उशिरा का होईना, जाग आलेल्या पीएमपी प्रशासनाने या धनादेशांचे वाटप सुरू केले आहे.(प्रतिनिधी)
निवृती वेतनधारकांचे धनादेश देण्यास प्रारंभ
By admin | Published: March 10, 2016 1:14 AM