लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरासबोतच ग्रामीण भागातदेखील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी गुरूवारी (दि. १८) दुपारी व्हिडीओ काॅन्फरन्सद्वारे जिल्हा आढावा बैठक घेतली. या बैठकीत ग्रामीण भागातील कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करा, मास्कची कारवाई वाढवा, लग्न व अन्य सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर कारवाई करा, काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा, ‘सुपर स्प्रेडर’ वेळीच शोधून काळजी घ्या, ‘हाॅटस्पाॅट’मध्ये कडक उपाययोजना करा, असे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. देशमुख यांनी यंत्रणेला दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदी बैठकीस ऑनलाईन उपस्थित होते.
डाॅ. देशमुख यांनी सांगितले की, ग्रामीण भागात संपूर्ण यंत्रणा सतर्क आहे. नवीन रुग्ण सापडल्यानंतर तातडीने काॅन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, रुग्णांना उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. याशिवाय मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणे, लग्न व सार्वजनिक ठिकाणी निश्चित केलेल्या संख्येपेक्षा अधिक लोक जमा झाल्यास कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
चौकट
ऑक्सिजन पुरवठ्यावर अधिक लक्ष
“रुग्णसंख्या वाढल्याने ऑक्सिजनच्या मागणीत देखील वाढ होत असून भविष्यात ही मागणी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच खबरदारी घेण्यात येत आहे.”
डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी