पुणे : रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केलेला मालधक्का पुन्हा सुरू करण्याची मागणी हमाल पंचायतचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांनी केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास महात्मा गांधी जयंतीनंतर पुणे रेल्वे स्टेशन येथे सुरु असलेली कामे बंद पाडण्याचा सत्याग्रह करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
मागील वर्षी रेल्वे प्रशासनाने कसलीही सुचना न देता मालधक्का अचानक बंद केला. मालधक्क्यात मालगाड्या आणणे बंद झाल्यामुळे शेकडो हमालांचा रोजगार बंद झाला. हुंडेकऱ्याचाही व्यापार ठप्प झाला. मालधक्का पुन्हा सुरु व्हावा म्हणून हमाल व हुंडेकऱ्यानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालया समोर डिसेंबर महिन्यात धरणे आंदोलन केले. यासाठी खासदार,रेल्वे मंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला. मात्र, धक्का बंद करून वर्ष होत आले तरी धक्का पुन्हा सुरु करण्याविषयी कसलीही हालचाल नाही, असे आढाव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी हुंडेकरी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र तरवडे व ट्रान्सपोर्ट व डॉक वर्कर्स युनियनचे सुहास जोशी उपस्थित होते.
माधक्क्याची जागा अधिकाºयांच्या बंगल्यांसाठी वापरण्याच्या धोरणामुळे धक्यावरचे काम, कमी होत गेले. त्यानंतर टप्प्याटप्याने धक्काच बंद करण्यात आला. धक्का अचानक बंद केल्यावर हमाल पंचायतीने मागिल नोव्हेंबरला विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलिंद देऊसकर यांची भेट घेतली. यावेळी सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही रेल्वे रुळाचे काम करत असून १५ दिवसात ते करून धक्का सुरू करू,असे आश्वासन दिले. पण दहा महिन्यानंतरही धक्का सुरु झाला नाही. उलट गेट बसविणे, प्रवेश बंद करणे, धक्क्याच्या जागेत खडीचा साठा करणे अशी कामे सुरु झाली आहेत. म्हणून या विषयी निर्णायक लढाई करण्याचे पंचायतीने ठरविले आहे. महात्मा गांधी यांच्या जयंती (दि. २ आॅक्टोबर) पर्यंत मालधक्का पुन्हा सुरू न झाल्यास रेल्वे स्थानकावरील सर्व कामे बंद पाडली जातील, असा इशारा आढाव यांनी दिला आहे.