नुकतीच शासकीय व खासगी रुग्णालयांची सामायिक बैठक दौंड येथील प्रशासकीय इमारतीत झाली. या बैठकीस प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.
आमदार कुल म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहर आणि ग्रामीण भागासाठी दोन फिरत्या व्हॅनमध्ये कोरोना तपासणी केंद्र सुरु करावे. या दोन्ही व्हॅन मुख्य चौकात थांबतील. वेळ पडल्यास थेट व्यापाऱ्यांच्या दुकानाजवळ जाऊन व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी आरोग्य पथकाव्दारे केली जाईल. तसेच यवत ग्रामीण रुग्णालयातील तक्रारी पाहता नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
तालुक्यातील कोरोनारुग्णांना बेड उपलब्ध व्हावेत यासाठी यवत आणि दौंड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटिलेटर बेड वाढविण्यात यावेत, यासाठी दौंडला ३० आणि यवतला ३० बेड वाढविण्याचे प्रशासनाने नियोजन करावे. कोरोना रुग्णांना आवश्यक रेमडेसिव्हिरचा सुरळीत पुरवठा होण्याकरिता प्रशासनाने सतर्क राहावे.
कोरोना रुग्णांचे योग्य नियोजन व तालुक्यातील शासकीय व खासगी कोविड केअर सेंटरच्या योग्य नियंत्रणासाठी तहसीलदार कार्यालयाद्वारे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी केल्या.
दररोज तीन हजार लसीकरणाचे उद्दिष्ट
तालुक्यात आतापर्यंत २९ हजार ५७१ नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याकडे भर देण्यात येणार आहे. तालुक्यात असणाऱ्या सर्वच केंद्रांवर लस कमी पडता कामा नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. येत्या काळात रोज तीन हजारांहून अधिक नागरिकांना लसीकरणाचे उद्दिष्ट असल्याचे आमदार राहुल कुल यांनी स्पष्ट केले.