लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात १५ तारखेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र, अद्यापही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. यामुळे आम्ही शिकायचे कसे? असा प्रश्न विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी उपस्थित केला आहे. शिक्षण विभागाने यंदा बालभारतीकडे ४ लाख २८ हजार ४४७ विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांच्या संचाची मागणी नोंदवली आहे. शाळा सुरू होऊन चार दिवस उलटूनही पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध झालेली नाहीत.
जिल्ह्यात ऑनलाइन पद्धतीने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. जवळपास २ लाख ८ हजार ६१० विद्यार्थ्यांचा ऑनलाइनसाठी एकूण पटसंख्या आहे. त्यातील १ लाख ३९ हजार ४६६ विद्यार्थी हे ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेत आहेत. यावर्षी १ ते ३ व ८ वीची एकूण ४ लाख २८ हजार ४४७ विद्यार्थी आहेत. सर्व शिक्षा अभियानांअतर्गत दरवर्षी मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येते. गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांच्या खात्यात पुस्तकांसाठी पेसे जमा करावे, असे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे ते शक्य होऊ शकले नाही. परिणामी जुन्याच पद्धतीने पुस्तके वाटली गेली. ४ लाख ३१ हजार ८५९ विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या संचाचे वाटप हे गेल्यावर्षी करण्यात आले होते. कोरोनामुळे ही पुस्तके शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्याचे प्रत्यक्ष वाटप केले होते. याही वर्षी कोरोनामुळे घरपोच पुस्तकांचे वाटप करण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन होते. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार बालभारतीकडे ऑनलाइन पद्धतीने ४ लाख २८ हजार ४४७ पुस्तकांच्या संचाची मागणी करण्यात आली. मात्र, शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पुस्तके मिळू शकली नाही. दरम्यान, गेल्यावर्षी पुस्तके मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची जुने पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला काही प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. मात्र, बालभारतीकडून पुस्तके कधी मिळणार याची प्रतीक्षा शिक्षण विभागाला लागली आहे.
चौकट
पुस्तकांच्या छपाईसाठी लागणाऱ्या कागदाचा अपुरा पुरवठा असल्याने छपाईस अडथळा आला होता. यामुळे मागणीच्या तुलनेत पुस्तके छापण्यात आली नव्हती. हे प्रकरण न्यायालयातही गेले होते. मात्र, आता कागदाची उपलब्धता झाली आहे. यामुळे लवकरच ती छापून मुलांना ती वितरित केली जाईल, असे बालभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि बालभारतीच्या छपाईला होत असलेल्या विलंब झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळा सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील शाळातील विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके जमा करून घ्यावीत, तसेच जमा करून घेतलेले संच विद्यार्थ्यांना वाटप करा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी गेल्या शैक्षणिक वर्षात वाटप केलेल्या पुस्तकांपैकी केवळ पाच ते सहा टक्केच पुस्तके परत आली आहेत. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यी पुस्तकाविनाच शिक्षण घेत आहेत. बालभारतीकडे मराठी विषयाचे ४ लाख ८ हजार ५३४ पुस्तकांचा संचाची मागणी करण्यात आली. हिंदी २ हजार ९०९, इंग्रजी १२ हजार ६८, उर्दू ४ हजार ८०८, तमिळ १२८ संचाची मागणी करण्यात आली आहे.
कोट
बालभारतीकडे आम्ही तालुकानिहाय विद्यार्थी संख्येनुसार ऑनलाईन पद्धतीने मागणी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पुस्तके मिळाल्यानंतर ही विद्यार्थ्यांना वितरित केले जाईल.
-स्मिता गौड, शिक्षणाधिकारी