पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अॅटोमोटिव्ह आॅटोमोशन, आयटी/आयटीएस, रिटेल मॅनेजमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी या विषयांच्या एम. वोक. (मास्टर इन वोकेशन) पदव्युत्तर अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केले जाणार आहेत. दीनदयाल उपाध्याय (डीडीयू) कौशल्य केंद्र म्हणून दर्जा मिळालेल्या संस्थांनाच एम. वोक. हा अभ्यासक्रम सुरू करता येतो. भारतात ६४ केंद्रांना हा दर्जा दिला आहे. त्याअंतर्गत निधीही उपलब्ध होतो. पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला हा दर्जा मिळाला आहे. म्हणूनच हा अभ्यासक्रम सुरू करता येणार आहे. विद्यापीठात ‘बॅचलर आॅफ वोकेशन’ हा अभ्यासक्रम २०१४-१५ पासून सुरू झाला आहे. त्यात अॅटोमोटिव्ह आॅटोमोशन, आयटी / आयटीएस, रिटेल मॅनेजमेंट आणि रिन्यूएबल एनर्जी या विषयांच्या पदव्या मिळतात. त्याचबरोबर आता त्याचे पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कौशल्य विकास केंद्राच्या संचालक डॉ. पूजा मोरे यांनी दिली.हा पॅटर्न नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्कनुसार (एनएसक्युएफ) लागू करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात ही लवचिकता असल्याने विद्यार्थी एखादे वर्ष शिक्षण घेतल्यानंतर अनुभव घेऊ शकतात आणि पुन्हा अधिक अभ्यास करण्यासाठी पुढच्या वर्षाला प्रवेश घेऊ शकतात, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. नव्याने सुरू करण्यात येत असलेला ज्वेलरी डिझायनिंग अँड जेमॉलॉजी हा पुणे व परिसरातील कौशल्याची आवश्यकता पाहून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे इतर ठिकाणी हा अभ्यासक्रम शिकवला जात असला, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना कामाचा अनुभव मिळणारएम. वोक. हा अभ्यासक्रम खासगी संस्थांच्या तुलनेत अतिशय माफक शुल्कात उपलब्ध करून दिला जाणार आहे. वोकेशन अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना कामाचा जास्तीत अनुभव मिळावा, याची काळजी घेतली जाते. बॅचलर अभ्यासक्रमातील तीन वर्षे वेगवेगळी मोजली जातात. एक वर्ष अभ्यासक्रम केला, तरी काही ना काही प्रमाणपत्र मिळते. अभ्यासक्रमाचे एक वर्ष पूर्ण केल्यानंतर, डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळते. दोन वर्षे पूर्ण केल्यानंतर अॅडव्हान्स डिप्लोमाचे पत्र मिळते आणि तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर पदवीचे प्रमाणपत्र मिळते.