पुणे: सरळ सेवा पद भरतीसाठी महाआयटीकडून कंपन्यांच्या निवड प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र, काळ्या यादीत टाकलेल्या कंपन्यांची नावे निवड यादीमध्ये दिसत असल्याने पुन्हा भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार होणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलने केली . या पार्श्वभूमीवर महाआयटीकडून सरळ सेवा पद भरतीसाठी सुमारे २५ वेळा मुदतवाढ देऊन कंपन्यांकडून अर्ज मागविण्यात आले. मात्र, लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सर्व भरती प्रक्रिया राबविण्यास संदर्भात सामान्य प्रशासन विभागातर्फे नुकतीच बैठक घेण्यात आली होती. मात्र, काळ्या यादीतील कंपन्यांनी निवड करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली होत असल्याचे दिसून येते आहे,असे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव म्हणाले, सरळ सेवा पदभरतीसाठी मनविसेकडून शासनाकडे पाठपुरावा केला जात होता.ओएमआर पद्धतीने सरळ सेवा पदभरती करण्यासाठी महाआयटीतर्फे कंपनीची निवड प्रक्रिया पूर्ण केली जात असून येत्या दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर कंपन्यांची अंतिम निवड यादी तंत्रज्ञान विभागाकडे पाठविली जाणार असल्याचे महाआयटीने मनविसेला कळविण्यात आले आहे. त्यामुळे सरळ सेवा पदभरतीचा मार्ग मोकळा झाला.