पुणे : कोरोनानंतर जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू झाल्या असून दररोजचा अहवाल करण्यासाठी शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती, शिक्षकांची कोरोना तपासणी, त्यातील एकूण बाधित शिक्षकांची माहिती शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या लिंकवर मुख्याध्यापकांनी ऑनलाइन पद्धतीने अपलोड करणे गरजेचे आहे. परंतु, काही मुख्याध्यापकांच्या निष्काळजीपणामुळे शिक्षण विभागाला या संदर्भातील अहवाल तयार करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळा सुरू ऑनलाईन अहवालाला ठेंगा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावीपर्यंतच्या अनेक शाळा आता सुरू झाल्या आहेत. विद्यार्थी उपस्थितीबाबत शहरी भागातील शाळांना फारसा प्रतिसाद मिळत नसला तरी ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी उपस्थिती लक्षणीय आहे. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची माहिती सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थितीची माहिती मुख्याध्यापकांनी दररोज शिक्षण विभागाच्या लिंकवर भरणे आवश्यक आहे.सध्या जिल्ह्यातील एकूण २ हजार ३५ शाळांपैकी १,८९७ शाळा सुरू झाल्या आहेत.या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण २ लाख ९१ हजार २५२ विद्यार्थ्यांपैकी १ लाख ३९ हजार ६६४ विद्यार्थी शाळेत येत आहेत.
-----------------
जिल्ह्यातील काही शाळांचे मुख्याध्यापक ही माहिती भरून देत नाहीत. तर काही दुर्गम भागातील शाळांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणींमुळे दररोज माहिती भरणे शक्य होत नाही. परिणामी शिक्षण विभागाला शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात अडचणी येत आहेत.
---------------------
कोरोनानंतर राबविल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी विद्यार्थी उपस्थितीची अचूक माहिती आवश्यक आहे. त्यामुळे सर्व मुख्याध्यापकांनी नियोजित वेळेत शिक्षण विभागाने दिलेल्या लिंकवर माहिती अपलोड करुन सहकार्य करावे.
- सुनील कुऱ्हाडे ,प्राथमिक शिक्षण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे
----------------
शिक्षण विभागाने केलेल्या सूचनेनुसार सर्व मुख्याध्यापकांनी विद्यार्थी उपस्थितीची माहिती भरणे आवश्यक आहे. परंतु, काही मुख्याध्यापक माहिती भरण्यास टाळाटाळ करतात. काहींना इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या अडचणी येत आहेत.
- महेंद्र गणपुले, मुख्याध्यापक
---------------
पालिकेच्या शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी यांच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थी उपस्थितीची आकडेवारी जमा केली जाते. काही कारणांस्तव १०० पैकी २० टक्के मुख्याध्यापकच शिक्षण विभागाकडे आकडेवारी जमा करत नसतील.
- हरिश्चंद्र गायकवाड ,मुख्याध्यापक
----------------------------------------------
जिल्ह्यातील शाळांची आकडेवारी
तालुका एकूण शाळा सुरू झालेल्या शाळा विद्यार्थी उपस्थिती
आंबेगाव ९९ ९५ ७,५२७
बारामती १३९ १३९ १३,४८६
भोर १५१ १४९ ५,९६०
दौंड १८३ १७९ १४,०६०
हवेली १९८ १८७ १३,६१४
इंदापूर १४२ १४० १५,२००
जुन्नर १८८ १६८ १२,१८३
खेड २२२ २१२ १७,०४०
मावळ २२० २०७ ११,०३५
मुळशी १२६ ८१ ६,१८५
पुरंदर १०० ९९ ७,४५३
शिरूर १८७ १६२ १४,१३५
वेल्हा ८० ७९ १,७५९
---------------------------------------------------------