पुणे : प्रजासत्ताक दिनापासून बहुचर्चित अशी शिवभाेजन थाळी राज्यभरात विविध ठिकाणी सुरु करण्यात आली. अवघ्या 10 रुपयांमध्ये गरीबांना पाेटभर जेवण या याेजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. दुपारच्या सुमारास ही थाळी नागरिकांना मिळणार आहे. या शिवभाेजन थाळीची एक शाखा फर्ग्युसन महाविद्यालयात देखील सुरु करावी अशी विनंती विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
अजित पवार यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेच्या आवारातील शिवभाेजन थाळी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. पुण्यातील विविध सात ठिकाणी ही शिवभाेजन थाळी सुरु करण्यात आली आहे. त्यात डेक्कन भागाचा समावेश नाही. त्यामुळे फर्ग्युसन महाविद्यालयात एक सेंटर सुरु करावे अथवा डेक्कन भागात एखादे सेंटर सुरु करावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. जेणेकरुन ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना देखील या याेजनेचा लाभ घेता येईल असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी अजित पवारांची भेट घेत त्यांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
फर्ग्युसन महाविद्यालयात मराठवाडा, विदर्भ यांसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. पुण्यासारख्या शहरात अर्धपाेटी राहून हे विद्यार्थी शिक्षण घेत असतात, त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिवभाेजन थाळी सुरु करण्यात यावी असे निवेदनात नमूद केले आहे.
याविषयी बाेलताना फर्ग्युसनचा विद्यार्थी संताेष रासवे म्हणाला, राज्यभरात सुरु झालेली शिवभाेजन थाळी याेजना खूप चांगली आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात दुष्काळग्रस्त भागातून येऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना अनेकदा अर्धपाेटी राहून शिक्षण घ्यावे लागते. त्यामुळे या याेजनेचे एक केंद्र फर्ग्युसन महाविद्यालयात देखील सुरु करण्यात यावी अशी विनंती आम्ही अजित पवारांना केली. फर्ग्युसन किंवा डेक्कन भागात कुठेही ही याेजना सुरु केल्यास डेक्कन भागातील विविध महाविद्यलयांमधील गरीब विद्यार्थ्यांना या याेजनेचा लाभ घेता येईल.