संदीप वाडेकर खडकवासला: राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ चा नारा देत अर्थचक्राचा गाडा रूळावर आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले आहेत करोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात बंद करण्यात आलेले गडकिल्ले आता पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. पुणे जिल्ह्यातील सिंहगड, राजगड, तोरणा,शिवनेरी, लोहगढ, पुरंदर, तिकोणा, तुंग, रायरेश्वर,रोहिडेश्वर आदी गड किल्ले सात महिन्यांपासून बंद आहेत. माथेरान सुरु झाले मग गडकिल्यांसाठीच बंदी का? असा सवाल सिंहगडावरील स्थानिक व्यावसायिकांकडून उपस्थित करण्यात आला असून गडकिल्ले पर्यटनासाठी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य सरकारने 'मिशन बिगिन अगेन' चा नारा देत अर्थचक्राचा गाडा रुळावर आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत लहान मोठे उद्योग- व्यवसाय सुरु केलेत. नुकतेच माथेरान सुरू केले असताना दुसर्या बाजुला मात्र राज्यातील पर्यटन व्यवसाय डबघाईला आला असताना गडकिल्ले मात्र पर्यटकांसाठी बंदच ठेवले आहेत. पर्यटनाचे बाबतीत हा दुजाभाव न करता राज्यातील गडकिल्ले आता पर्यटकांसाठी खुले करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्याचे शर्थीचे प्रयत्न करत सरकारकडून 'मिशन बिगिन अगेन' नारा देण्यात आला असून राज्यातील दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न चालले आहेत.राज्यांतर्गत दळणवळण वाहतुक सुरू झाली असून हॉटेल,रेस्टॉरंट,लॉजिंगसह मॉल्स,उद्योगधंदे व कारखानदारी पूर्वपदावर आणली जात आहे. माथेरान पर्यटनस्थळ खुले करण्याचा स्वतंत्र आदेश नुकताच स्थानिकांचे आग्रहाखातर घेतला गेला असताना राज्यातील पर्यटनस्थळावरील बंदी मात्र कायम ठेवल्याने गडकिल्ले पर्यटकांसाठी अद्याप बंदच आहेत. पर्यटनस्थळांवर अवलंबून असलेला मोठा वर्ग आज चिंताग्रस्त असून त्यामुळे ग्रामीण भागातील लहान मोठे हॉटेल व्यवसाय ठप्पच आहेत. पुणे शहरालगतच्या सिंहगड-खडकवासला परिसराला देखील या गडकोट बंदीचा मोठा फटका बसला असून गेल्या सात महिन्यांपासून सिंहगड व घेरा परिसरातील साडेचारशे कुटुंबे आर्थिक कोंडीत सापडली आहेत.. लगतच्याच खडकवासला- पानशेतच्या पर्यटनावर अवलंबून असलेल्या ३० ते ३२ गावांतील स्थानिक व्यवसायिकांनाही देखील याची झळ सोसावी लागत आहे.गडावरील हॉटेल चालक,दही-ताक विक्रेते व खासगी प्रवासी वाहन चालक आणि मालक असे जवळपास साडेचारशेच्यावर व्यावसायिक तर पुरते हतबल झाले आहेत. पर्यटनावर अवलंबून असलेले स्थानिक आदिवासी गडकरी आज नोकरी व रोजंदारीचे शोधात असताना त्यांचे पदरी निराशा पडत आहे. सरकारने लॉकडाऊनमध्ये काहीशी शिथीलता आणली खरी मात्र ग्रामीण भागातील पर्यटनस्थळावरील या बंदिने स्थानिकांच्या हातापोटावरच्या व्यवसायाला लगामच बसला आहे. गडकिल्ले व पर्यटनस्थळांवरील बंदी उठवून येथील गोरगरीबांच्या विझलेल्या चुली आता तरी पेटवा अशी साद सिंहगडचे स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाच घातली आहे. सिंहगडची कांदा भजी व दही-ताक तर पर्यटकांची पहिली पसंती,येथील पावसाळी हवामान व पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात लोक येथे येतात. गडबंदीमुळे येथील पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेल्या येथील बहुसंख्य लोकांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सहली करीता व व्यायामा करीता हक्काचे ठरणारे गडकिल्ले मागील सात महिन्यापासून बंदच आहेत.... सिंहगड खडकवासल येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या पश्चिम हवेलीतील एक हजाराचे वर स्थानिक व्यावसायिकांना गडबंदीची झळ सोसावी लागत असुन कोरोना संकटाचा विचार करून पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांना काही अटी घालून गडकिल्ले सुरु करण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे रमेशबापू कोंडे शिवसेना जिल्हाप्रमुख
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने प्रथम गर्दी होणारी पर्यटन स्थळे गडकोट बंद केले. गेले सात महिन्यांपासून किल्ल्यांवरील बंदीमुळे सेवाउद्योग बंद असल्यामुळे अर्थकारण थांबले आहे. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. काही अटी वशर्थीवर शासनाने परवाणगी दिल्यास गड किल्ले खुले करण्यात येतील.- विलास वहाणे सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग पुणे.