कळस: कळस येथील तलाठी कार्यालय गेल्या दहा दिवसांपासून कुलुपबंदच आहे. कार्यालयातील तलाठी गावाकडे गेल्याने व पर्यायी तलाठी फिरकलेच नाहीत. त्यामुळे गावातील सर्व कारभार ठप्प झाला आहे. जमीन महसूल व्यवस्थेतील तलाठी महत्वाचा कर्मचारी आहे. मात्र कार्यालयच १० दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
कळस व रूई, बिरंगुडी, गोसावीवाडी, पिलेवाडी, मराडेवाडी, थोरातवाडी या सात महसुली गावांसाठी कळस याठिकाणी कार्यालय आहे. याठिकाणी नव्याने परजिल्ह्यातून आलेले तलाठी ११ एप्रिलला गावाकडे गेले. यांनी रजेचा अर्जही पाठवला आहे. त्यानंतर पर्यायी तलाठीही कार्यालयाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे नागरीकांचा विनाकारण वेळ जात आहे. आपल्या विविध कामासाठी दुरवरुन पायपीट करुन येणाऱ्या ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांत कार्यालय सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा करण्याचा इशारा नागरिकांनी यावेळी दिला आहे.
शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकारने तलाठी नियुक्त केले आहेत. नागरिकांची रहिवाशी व उत्पन्नाचे दाखले आणि सातबारा देणे व शिधापत्रिका देणे, फेरफार नोंदी करणे, जमीन महसूल गोळा करणे, वारसा प्रकरणांच्या नोंदी करणे, यांसारखी महत्वाची कामे या कार्यालयातून केली जातात नागरिकांना माहिती देण्यासाठी देखील येथे कोणतीही यंत्रणा नाही. त्यामुळे हेलपाटे मारण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहिलेला नाही. नागरिकांनी यावर तीव्र संताप व्यक्त करत दोन दिवसात कार्यालय सुरु करण्याची मागणी केली आहे.