पुणे : शहरातील कोरोना संसर्ग बहुतांशी आटोक्यात आला असून, ‘अनलॉक’कडे जाताना १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीच कोरोनाचे ‘सुपरस्प्रेडर’ ठरू शकतात. त्यामुळे भविष्यातही कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण तातडीने सुरू करण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
कोरोना प्रादुर्भाव आढावा बैठक शुक्रवारी (दि. २८) आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी मोहोळ यांनी ही मागणी केली. म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे इंजेक्शनचा पुरवठा राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावा, असेही ते म्हणाले.
चौकट
शुल्क आकारणीवर निर्णय घ्या
वर्षभर शाळा बंद असल्याने सर्वत्र ऑनलाइन वर्ग घेण्यात आले. तरीही शाळा पालकांकडून संपूर्ण शुल्क आकारत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या आहेत. सामान्य नागरिकांना हकनाक भुर्दंड बसत असून, याबाबत राज्य सरकारने तातडीने शाळांना सूचना देऊन हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य सरकारकडे केली.