आव्हाळवाडी : वाघोली-लोहगाव रस्त्यावर असून स्प्लेंडर काउंटी सोसायटी ते वॉटर पार्क चौक या दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. येत्या दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरु करावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येतील, अशा इशारा श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
वाघोली-लोहगाव हा केसनंद मार्गे राहूला जोडणारा राज्य मार्ग असून या रस्त्याची गेल्या दोन वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांसह अपघाताला सामोरे जावे लागत आहे. वाघोली स्प्लेंडर काउंटी सोसायटी ते वॉटर पार्क या दरम्यान मोठ्या प्रमाणात रस्त्यात खड्डे आहेत. या जीवघेण्या रस्त्याबाबत नागरिकांनी संबधित विभागाला वारंवार रस्त्या दुरुस्तीची मागणी केली आहे. परंतु संबधित विभागाकडून केवळ आश्वासने देवून दुर्लक्ष केले जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
येत्या दहा दिवसांत रस्त्याचे काम सुरू न केल्यास संबधित कार्यालयाला टाळे ठोकण्यात येणार असल्याचा इशारा श्री शिव छत्रपती प्रतिष्ठानकडून देण्यात आला आहे.
--
फोटो ओळ : २३ आव्हाळवाडी अभियंता बांधकाम
सा. बां. विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देताना श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे पदाधिकारी.
230921\1728-img-20210923-wa0012.jpg
सा बा विभाग अधिकारी यांना निवेदन देताना