पुणे : साधारण मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. ग्रामपंचायत निवडणुका जशा जिंकल्या त्याचपद्धतीने आपल्याला जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुकाही जिंकायच्या आहेत, महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकांच्या कामाला लागा, असा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना दिला.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी सकाळी मार्केट यार्ड येथील एका सभागृहात बोलावली होती. पवार हे देखील या बैठकीला थोडावेळ उपस्थित होते. त्यांनी तालुकाध्यक्षांकडून त्यांच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. गावांमध्ये काम करताना येणाऱ्या अडचणींविषयी ऐकून घेतले. काही पदाधिकाऱ्यांनी यावेळी नेते लक्ष देत नसल्याची तक्रार केली. पवार यांनी सबुरीचा सल्ला देत पक्षाचे काम वाढवण्यास सांगितले. अडचणी असतात, मात्र त्या दूर करून पक्षाचे धोरण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. सत्ता समाजकारणासाठी उपयोगात आणायची असते, असे त्यांनी सांगितले.
गारटकर यांनी पवार यांना जिल्ह्याचा आढावा सांगितला. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पक्षाचे कामगिरी अन्य कोणत्याही पक्षांपेक्षा उजवी असल्याचे सांगितले. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी तालुका तसेच गावस्तरावरही कार्यकर्ते सज्ज असल्याचे ते म्हणाले.
बैठक अत्यंत व्यवस्थित झाली. काही कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या, मात्र त्या स्थानिक स्तरावरच्या होत्या. त्या समजून घेतल्या जातील व त्याचे निराकरण केले जाईल. निवडणुकांच्या दृष्टीने कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्याचे प्रस्तावित आहे.
- प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.