आसखेड : भामा-आसखेड धरणातून शनिवारी (दि. २०) पाणी सोडण्याचा आदेश होता; परंतु कित्येक वर्षांपासून धरणग्रस्तांचे पुनर्वसन, तसेच काही प्रश्न रखडल्याने आधी आमचे प्रश्न सोडवा, त्यानंतरच पाणी सोडू देऊ, अशी भूमिका धरणग्रस्तांनी घेतली होती. शासनाने शुक्रवारपर्यंत निर्णय घेत प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर ३१ तारखेपर्यंत प्रश्न सोडविले जातील, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर शनिवारी सकाळी १०.२० वाजता ११०० क्युसेक्सने व १२.२० वाजता १ हजार ६५३ क्युसेक्सने पोलीस बंदोबस्तात आसखेड धरणातून पाणी सोडण्यात आले, अशी माहिती शाखा अभियंता भारत बेंद्रे यांनी दिली.सध्या आसखेड धरणात १०० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी सुमारे १ हजार २९२ मिलिमीटर पाऊस पडल्यामुळे विहिरी-नाले समाधानकारक भरलेली होती. परंतु यंदा फक्त ७७५ मिलिमीटरच पाऊस झाला. त्यामुळे समोर येऊन ठेपलेल्या दुष्काळामुळे पाण्याचे नियोजन करणे हे धरण प्रशासनापुढील महत्त्वाचे आव्हान आहे. रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० आॅक्टोबरला सोडणे अपेक्षित होते. परंतु धरणग्रस्तांच्या कित्येक वर्षीच्या प्रलंबित प्रश्नामुळे त्यांनी केलेल्या विरोधामुळे ६ दिवस पाणी सोडण्यास उशीर झाला. त्यामुळे खेड, शिरूर, दौंडला वरदान ठरत असलेले भामा-आसखेडच्या पाण्याने यंदा शेतकºयांच्या पिकांना अडचणीत आणले.धरणाची पाणी साठवणक्षमता ८.१४ टीएमसी एवढी आहे. धरणात सध्या १०० टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी ६७१.५० मीटर आहे. धरणात २३०.६४७ दलघमी व उपयुक्त पाणीसाठा २१७.१२५ दलघमी आहे. वेळोवेळी या धरणातून सोडण्यात येणाºया पाण्यामुळे खेड तालुक्यासह शिरूर, दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावांना आणि विविध गावच्या पाणी योजनांना होतो. त्याबरोबर नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे पूर्णपणे भरले जातात. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या पाण्याचा फायदा खेडसह शिरूर व दौंड या तीन तालुक्यांना होणार आहे. त्यामुळे हे धरण तीनही तालुक्यांतील शेतकरी व नागरिकांना कायमच वरदान ठरले आहे, तर नदीकाठाजवळपासच्या गावांची तहान भागली आहे.शनिवारी सोडण्यात आलेले पाणी आलेगावपागापर्यंत पोहोचेल, अशा बेताने सोडण्यात येणार आहे. धरणग्रस्तांच्या आंदोलनामुळे लांबणीवर पडलेले आवर्तन सुमारे ३० ते ३५ पोलीस कर्मचाºयांच्या बंदोबस्तात सोडण्यात आले. सुरुवातीला ११०० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या आश्वासनानंतरही दक्षता म्हणून धरण प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात पाणी सोडले.यावेळी धरण प्रशासनाचे कार्यकारी अभियंता बी. के. शेटे, पोलीस निरीक्षक सुनील पवार, पं. स. सदस्य चांगदेव शिवेकर, उपविभागीय अधिकारी एस. आर. शर्मा, शाखा अभियंता भारत बेंद्रे आदींसह पोलीस यंत्रणा, ग्रामस्थ, नागरिक व धरण प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते. परंतु जिल्हाधिकाºयांच्या सूचनेचे पालन करीत प्रकल्पग्रस्त (बाधित शेतकरी) धरणाकडे विरोध करण्यास फिरकले नाही.
भामा-आसखेडमधून विसर्ग सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:46 AM