देहूगाव : श्रीक्षेत्र देहूगावच्या ग्रामस्थांनी श्रमदानातून देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या कामानंतर जाग आलेल्या पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. रस्त्याचे खड्डे बुजविण्याच्या पालिकेच्या या निर्णयामुळे तात्पुरते अपघात तरी थांबले असून, वाहनचालकांना व पायी चालणाºयांना दिलासा मिळाला असल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत ‘लोकमत’ने मंगळवारी(दि. २१) रोजी नागरिकांना कीव, पण प्रशासन निगरगठ्ठ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मंगळवारीच रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले होते. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने खड्डे समतल करून घेतले व काही खड्ड्यांमधील पाणी रस्त्याच्या कडेला काढून देण्यात आले. या रस्त्यावरील तात्पुरते खड्डे बुजविण्यासाठी जीएसबी वेटमिक्स साहित्याचा वापर केला आहे. मात्र मंगळवारी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने या कामात सातत्याने अडथळे येत होते. हे खड्डे बुजविण्याचे काम आज पुन्हा सुरू होते. यासाठी जीएसबी वेट मिक्सचे पाच ते सहा ट्रक वापरण्यात येणार असल्याची माहिती संबंधित ठेकेदाराने दिली.दरम्यान, प्रशासनाच्या असहकाराला कंटाळून गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन सक्षम लोकांच्या सहकार्यातून आपणच रस्त्याचे खड्डे बुजवायचे असा निर्णय झाला. वीटभट्टीचे रॅबिट व विटांचा चुरा रस्त्यावर टाकून त्याला समतल करण्याचे काम सुरू करण्यात आले. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे लवकरच बुजविणार आहेत. याबाबत परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हे काम लवकरच पूर्ण करावे, अशी मागणीही नागरिकांमधून होत आहे.
पालिकेकडून देहू-आळंदी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 3:26 AM