पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक व अहमदनगर उपकेंद्रांवर विद्यापीठातर्फे लवकरच नवीन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. भाडेतत्त्वावर इमारत घेवून पुढील महिना- दीड महिन्यात रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू होतील, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.विद्यापीठाचा शैक्षणिक भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने विद्यापीठाला अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात स्वत:च्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. या केंद्रांच्या माध्यमातून अद्याप एकहीअभ्यासक्रम सुरू करण्यात आला नाही. उपकेंद्राच्या जागेवर इमारत बांधून त्यानंतर अभ्यासक्रम सुरू करण्यास काही वर्षांचा कालावधी जाईल. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच भाडेतत्त्वावर इमारत घेऊन विद्यापीठातर्फे येथे अभ्यासक्रम सुरू केले जातील.विद्यापीठाच्या उपकेंद्रातील कार्यालयांच्या माध्यमातून लवकरच नवनवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. नाशिकजवळ येवला येथे ‘पैठणी’ उद्योग आहे. तसेच द्राक्ष उद्योगांना पूरक असणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही विद्यापीठाचा विचार आहे. त्यामुळे विद्यापीठाची उपकेंद्र पुढील काळात सक्षम करून रोजगारभिमुख कौशल्य अभ्यासक्रम चालविले जातील.दरम्यान, विद्यापीठाच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. तसेच बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे बदलले जाणार असून आवश्यतेनुसार नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. विद्यापीठातील रस्त्याच्या दोन्ही बाजूला अधिकाधिक स्ट्रीट लाईट बसविल्या जाणार आहेत, असेही करमळकर म्हणाले.
उपकेंद्रात अभ्यासक्रम सुरू करणार, विद्यापीठाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 6:42 AM