पुणे: कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने नवनवीन उपक्रम, कला, साहित्य आणि कृती अशा गमतीजमतीपासून विद्यार्थ्यांना दूर राहावे लागत आहे. ऑनलाईन शाळेच्या माध्यमातून शैक्षणिक अभ्यासक्रमावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच मैदानी खेळ, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, ऍक्टिव्हिटी, व्यायाम हे शिकायलाही आवडत असते. त्याच पार्श्वभूमीवर अँक्टिव्ह टीचर्स समूहाने मस्ती की पाठशाला हा नवीन उपक्रम सुरू केला आहे.
युट्युब, झूम, व्हाट्स अँपच्या माध्यमातून चालणाऱ्या या ऑनलाइन उपक्रमात दररोज राज्यभरातून 10 ते 20 हजार विद्यार्थी सहभागी होत आहेत. अशी माहिती समूहाचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
ऑनलाइनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध उपक्रम शिकवले जातात. शिवाय त्याबद्दल पूर्णपणे माहिती दिली जाते. मस्ती की पाठशाला या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा भरभरून उत्साह दिसून येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शाळा सुरू असताना मुलांसाठी इतर उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे त्यांचा शिक्षणातही रस वाढत जातो. सध्याचे वातावरण पुर्णपणे बदलले आहे. घरी बसून विद्यार्थी फारच कंटाळल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीतीही विद्यार्थ्यांना वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत आम्ही हा उपक्रम चालू करून विद्यार्थ्यांच्या मनातील अस्वस्थता दूर करून त्यांचे मन प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. मस्ती की पाठशालामध्ये काय होते
पाठशालेत बहुलीनाट्य, कथा, गोष्टी, चित्रकला आणि हस्तकला दाखवल्या जातात. तसेच आरोग्यदायक व्यायामही करून घेतला जातो.
गुगल फॉर्मद्वारे केली विद्यार्थ्यांची माहिती संकलित
उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होण्याच्या दृष्टीने जिल्हानिहाय गुगल फॉर्मद्वारे विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
"उपक्रमासाठी आमचे सर्व सदस्य कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होण्याच्या अनुषंगाने समूहाकडून शैक्षणिक तयारी करून घेतली जाणार आहे. १५ जून पासून शालेय अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाणार आहे. १ ऑगस्टपासून नियमित अध्यापन केले जाणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले".