नारायणगाव : जुन्नर तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वारूळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्याने सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेलला दहा जागा मिळाल्या आहेत, तर विरोधी भागेश्वर ग्रामविकास पॅनेलला सात जागा मिळाल्या असल्याने सदस्य फोडाफोडीचे राजकारण लक्षात घेऊन पॅनलप्रमुखांनी सर्व सदस्य अज्ञातस्थळी रवाना केल्याने कोणत्या पॅनलमधून सदस्य फुटणार का? याकडे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
वारूळवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अटीतटींची व लक्षवेधी ठरली. या निवडणुकीत संजय वारूळे, जालिंदर कोल्हे, जंगल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित गणपीर बाबा ग्रामविकास पॅनेल तर ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल मेहेर, अध्यक्ष प्रकाश पाटे, जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, माजी सरपंच आत्माराम संते, माजी सरपंच देवेंद्र बनकर या दिग्गजांच्या नेतृत्वाखाली भागेश्वर ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत होऊन आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. या निवडणुकीत प्रस्थापित गणपीर बाबा पॅनलला १७ जागांपैकी १० जागा मिळाल्याने सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांचे वर्चस्व कायम राहिले आहे.
येत्या दि. ९ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक होत असल्याने या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरपंच सर्वसाधारण राखीव असल्याने सरपंच पदासाठी माजी सरपंच जंगल कोल्हे व राजेंद्र मेहेर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उपसरपंचपद हे महिला सदस्यांना मिळेल अशी चर्चा आहे. पॅनेलप्रमुख संजय वारूळे व जालिंदर कोल्हे यांच्या पॅनेलला १० जागा मिळाल्याने ५ वर्षांच्या कालावधीत ५ जणांना सरपंच आणि ५ जणांना उपसरपंचपदाची संधी देऊन सर्वांचे समाधान करणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे.
विरोध गटात ७ सदस्य असल्याने काही सदस्य फोडून सरपंचपद मिळविण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. पॅनेल बदल्यास अपात्र होण्याची भीती असल्याने सदस्य फुटण्याची शक्यता खूप कमी आहे तरही रिस्क नको म्हणून एका पॅनेलचे सर्व सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत.