पुणे : शहरात कोरोना रूग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढू लागली आहे. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक आदी शहरांची लोकसंख्या पाहता लसीकरणाचा वेग वाढविला पाहिजे. त्याकरिता राज्य व केंद्र शासनाने समन्वय साधून लसीकरण केंद्र वाढविण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
नागरिक लस घेण्यास तयार आहेत. शहरात ८०० खासगी रुग्णालये आहेत आणि शासकीय १०० रुग्णालये आहेत. या एकूण ९०० रुग्णालयांमध्ये जर लसीकरणाची सुविधा निर्माण केली तर दिवसाला ३० हजार नागरिकांना लस देणे शक्य होणार आहे. असे झाल्यास दोन महिन्यात शहरातील सर्व नागरिकांना लस मिळू शकेल.
पुण्यातील रुग्णसंख्या वाढत चालली आहे. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. लोकसंख्या जास्त असल्याने रूग्णांची संख्याही अधिक दिसते आहे. शहरात कोरोना रूग्णांसाठी ४ हजार २०० खाटा उपलब्ध आहेत. यातील २ हजार २०० खाटा रिकाम्या असून उर्वरित दोन हजार खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत.
संसर्गाचा वेग अधिक असला तरी त्याची तीव्रता कमी आहे. नागरिकांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. गृह विलगिकरणामध्ये राहून उपचार घेण्याकडे नागरिकांचा कल अधिक आहे. आवश्यकता वाटल्यास यापूर्वी करार केलेल्या खासगी रुग्णालयांसोबतचे करार पुन्हा वाढविण्यात येतील. रुग्ण संख्या वाढली तर आवश्यकतेनुसार जम्बो रुग्णालय सुरू करण्याचा विचार असल्याचे मोहोळ म्हणाले.-----कोव्हॅक्सिन की कोविशिल्ड यावरून काळजी करण्याचे कारण नाही. दोन्ही लसी प्रमाणित आणि भारतातच तयार झालेल्या आहेत. ज्यांनी नागरिकांना पहिला डोस देण्यात आलेला आहे, त्याच कंपनीचा दुसरा डोस दिला जाईल ही पालिकेची पर्यायाने आमची जबाबदारी आहे. नागरिकांनी कोणतीही लस घ्यावी. दोन्हीमध्ये फरक नाही. मनात कोणताही संदेह आणू नका. आजवर शहरात १ लाख ७५ हजार नागरिकांना लसीकरण झाले आहे.