पुणे : राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी घेतल्या जाणा-या ‘सी-सॅट’च्या पेपरमधील क्लिष्ट प्रश्नांमुळे कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, इंजिनिअरिंगचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उत्तीर्ण होत असल्याची तक्रार स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सी-सॅटच्या पेपरमधील गुण केवळ पात्रतेसाठीच गृहीत धरण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली आहे.राज्यसेवा आयोगाकडून डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात प्रकाशित करून आगामी परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला जातो. ही जाहिरात प्रकाशित होण्यापूर्वी राज्यसेवा आयोगाने यूपीएससीप्रमाणे सी-सॅटच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल करावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. सी-सॅटच्या पेपरमध्ये गणित व विज्ञान विषयांच्या प्रश्नांचा भरणा अधिक असतो. त्यामुळे कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या पेपरची काठिण्यपातळी अधिक असते. उतारा वेळ अधिक जातो. हा पेपर अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना तुलनेने सोपा जातो. यूपीएससीकडे सी-सॅटच्या पेपरबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांनी त्यामध्ये बदल करून तो केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरला आहे. त्यानुसार एमपीएससीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.
राज्यसेवेचा सी-सॅट पेपर फक्त पात्रतेसाठीच असावा, विद्यार्थ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 6:57 AM