धायरी : महिलांचे प्रश्न जेव्हा पुरुष समजून घेतील आणि ते सोडविण्यासाठी प्रयत्न करतील, तेव्हा महिलांचे निम्मे प्रश्न संपलेले असतील. राज्य महिला आयोग म्हणजे पुरुषांच्या विरोधातच असा अनेकांचा समज होतो; परंतु आमची लढाई समाजाच्या विकृतीच्या विरोधात आहे. अन्याय करणाऱ्यांपेक्षा सहन करणारा जास्त दोषी असतो. प्रत्येक वेळेला तुमच्या मदतीला कोणी येईल ही भावना महिलांनी काढून टाका, स्वत:च्या आयुष्याची लढाई स्वत:च लढायची आहे. मातीत घट्ट पाय रोवून उभे राहा आणि संकटांचा सामना करा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केले.
नऱ्हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने 'सॅनिटरी नॅपकिन बँक आपल्या आरोग्यासाठी' या उपक्रमांतर्गत जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी रूपाली चाकणकर यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला आरोग्य विभागाच्या डॉ. प्रीती संकपाळ, पोलिस उपनिरीक्षक अस्मिता लाड, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर उपस्थित होते.
पुणेकर म्हणून जसा अभिमान वाटतो तशी खंतही वाटते...
जंगलाच्या मध्य भागात राहणारे आदिवासी शिक्षणाने किंवा आर्थिकदृष्ट्या कमी असतील, परंतु तेच मला खऱ्या अर्थाने श्रीमंत वाटले, कारण मुलीच्या जन्माचे तीन दिवस स्वागत या आदिवासी पाड्यावर केले जाते. मी पुण्याचीच आहे. पुणेकर म्हणून जसा अभिमान वाटतो तशी खंतदेखील वाटते. आदिवासी पाड्यांवर मुलींचे प्रमाण मोठे आहे, त्यापेक्षा कमी प्रमाण पुणे शहरात आहे. आजही समाजात वंशाला वारसदार मुलगा हवा असतो, यासाठी मुलीची हत्या केली जाते. समाजात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.