पिंपरी : गोवा येथे विक्रीसाठी असलेली विदेशी दारू व बिअरची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पकडले. मळीपासून तयार केलेले खत या ट्रकमध्ये होते. खतामध्ये लपविलेला ४४ लाख ४८ हजार १०० रुपयांचा मद्यसाठा तसेच १२ लाखांचा ट्रक असा ५६ लाख ४८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील भरारी पथक क्रमांक २ यांनी बारामती येथे शुक्रवारी ही कारवाई केली.
ट्रकचालकासह तीन आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार बारामती तालुक्यात तीन ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी आरोपी यांचा ट्रक फलटणमार्गे सांगवीकडून बारामतीच्या दिशेने भरधाव जात होता. पथकाला संशय आल्याने ट्रकचा पाठलाग केला. कारभारी चाैकात ट्रकला थांबवून ट्रकचालक याच्याकडे चाैकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर ट्रकमधील मळीच्या खताची पाहणी केली. त्यावेळी खतामध्ये दारुच्या बाटल्यांचे बाॅक्स मिळून आले. गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी दारुच्या बाटल्यांचे ७१० बाॅक्स तसेच बिअरच्या बाटल्यांचे १९० बाॅक्स मिळून आले. या मद्याची महाराष्ट्रातील किंमत ४४ लाख ४८ हजार १०० रुपये असून, ते जप्त करण्यात आले. तसेच १२ लाख किमतीचा ट्रकही जप्त केला.
भरारी पथकाचे निरीक्षक अनिल बिराजदार, विजय मनाळे, दुय्यम निरीक्षक विकास थोरात, डी. बी. पाटील, विठ्ठल रसाळ, प्रशांत धाईंजे, अनिल सुतार, कर्मचारी नवनाथ पडवळ, आर. बी. सावंत, सचिन मांडेकर, रवी लोखंडे, अनिल थोरात, विनोद पटकुरे, विजय विंचूरकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.