लोकमत न्यूज नेटवर्क
खोर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक तळागाळातील जनतेच्या प्रश्नांची उत्तरे राज्य सरकारने देऊन प्रत्येक समाजाला फुल ना फुलाच्या पाकळीची मदत राज्य सरकारने केली आहे. मग पुणे जिल्ह्यातील नाभिक समाजावर राज्य सरकार का भेदभाव करीत आहे. या समाजाला आर्थिक मदत करण्याचे घोडे कोठे अडकून बसले आहे, असा थेट सवाल दौंड तालुका नाभिक संघाचे अध्यक्ष गणेश साळुंके व पुणे जिल्ह्याचे कोशाध्यक्ष मारुतीआप्पा पंडित यांनी केला आहे.
सुखी प्रपंचाचा गाडा हाकताना हातावर असलेले पोट कोरोना महामारीच्या रोगाने भरणे कठीण झाले आहे. जिल्ह्यातील सगळ्याच गावामध्ये नाभिक समाजाची फरफट झाली असून या समाजाला कोणत्याच योजनेचा आधार उरला नाही. जिल्ह्यात जवळपास १५ हजाराच्या वर सलून दुकाने असून जवळपास ५० हजाराच्या आसपास चालक, मालक, कारागीर काम करीत आहेत. मात्र, आज सगळ्यांवर उपासमारीची वेळ येऊन ठेवली आहे. राज्य सरकार या समाजाकडे दुर्लक्षित करीत असून केवळ मतांपुरते या समाजाचा वापर केला जात असल्याची टीका दौंड तालुकाध्यक्ष गणेश साळुंके यांनी व्यक्त केली आहे. नाभिक समाजाच्या अनेक मागण्या या धूळखात पडल्या असून एकही प्रश्न नाभिक समाजाचा पूर्ण करण्यात राज्य सरकारला यश आले नाही ही मोठी शोकांतिका आहे. दौंड तालुक्यातील पाटस गावात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रशांत शितोळे यांनी ३६ सलून दुकानांना तब्बल ५ हजार रुपये प्रमाणे १ लाख ८० हजाराची मदत केली आहे. जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात असे अनेक दानशूर व्यक्ती आहेत. ज्यांनीदेखील प्रशांत शितोळे यांच्या सारखे अनुकरण करून या समाजातील गोर गरीब हातावर पोट असलेल्या समाजातील लोकांच्या साठी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन दौंड तालुका नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.